South Africa Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सहभागी असलेले २० संघ इतके तगडे संघ आहे की, कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. याचा प्रत्यय स्पर्धेतील सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये पाहायला मिळाला आहे. नेपाळने इंग्लंडला जवळजवळ पराभूत केलं होतं. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननेही दक्षिण आफ्रिकेवर जवळजवळ विजय मिळवला होता. पण डबल सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. दरम्यान हा सामना जिंकताच दक्षिण आफ्रिकेने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर डबल सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ हा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात डबल सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे. याआधी बऱ्याचदा सुपर ओव्हरमध्ये सामन्याचे निकाल लागले होते. पण डबल सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ होती. तर अफगाणिस्तानचा संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ वेळा डबल सुपर ओव्हरमध्ये सामना गमावणारा पहिलाच संघ ठरला आहे. याआधी भारतीय संघाविरूद्ध झालेल्या डबल सुपर ओव्हरमध्येही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या , सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी २० षटकांअखेर ६ गडी बाद १८७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकल्टनने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने ५९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने ८४ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात अफगाणिस्तानचा डाव १८७ धावांवर आटोपला. त्यामुळे सामना टाय झाला.

सुपर ओव्हरमध्ये पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानने ६ चेंडूत १७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही १७ धावा करता आल्या. त्यामुळे सामना पुन्हा एकदा बरोबरीत सुटला. डबल सुपरओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६ चेंडूत २३ धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला थोडक्यात गमवावा लागला.