भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना, दक्षिण आफ्रिकेच्या गोटात चिंतेच वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र मानला जाणाऱ्या डेल स्टेनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. दुखापतीमधून सावरलेल्या डेल स्टेनची भारताविरुद्ध कसोटी मालिकेत निवड करण्यात आली आहे, मात्र स्टेन अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनाने स्टेनच्या सहभागावर अंतिम निर्णय घेतला नाहीये.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेची ‘स्टेन’गन परतली, भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर

“डेल स्टेन हा सध्या तंदुरुस्त आहे. मात्र पहिल्या कसोटीत त्याला संघात स्थान मिळेल की नाही याबद्द मी साशंक आहे. खेळपट्टी आणि वातावरण पाहता स्टेनची दुखापत पुन्हा बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम संघ निवडताना आम्हाला इतर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.” दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांनी ही माहिती दिली आहे.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेतला दुष्काळ भारतीय संघाच्या पथ्यावर??

खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे गेलं वर्षभर डेल स्टेन दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाहेर होता. त्यामुळे स्टेनला संघात खेळवण्याचा निर्णय हा वेळ बघून घेण्यात येईल. केप टाऊनची खेळपट्टी ही जलदगती गोलंदाजांना मदत करणारी आहे, त्यामुळे एक अधिकचा गोलंदाज खेळवण्याची रणनिती ठरल्यास स्टेनला संघात जागा मिळू शकेल असंही गिब्सन म्हणाले.