महाराजची हॅट्ट्रिक

सेंट ल्युशिया : केशव महाराजने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर १५८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. याचप्रमाणे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असे निभ्रेळ यश मिळवले. सामन्याच्या चौथ्या दिवशी उपाहाराआधीच्या दुसऱ्या षटकात महाराजने किरान पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशुआ डासिल्व्हा यांना बाद करून हॅट्ट्रिक साकारली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक साकारणारा महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी १९६०मध्ये जेफ ग्रिफिनने इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रिक साकारली होती.

वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवल्यामुळे विंडीजवरील दडपण वाढले. परंतु महाराजने ३२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचा दुसरा डाव १६५ धावांत गुंडाळला. मार्च २०१७नंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथमच परदेशात मालिका जिंकण्याची किमया साधली.

वेस्ट इंडिजवर कारवाई

दुबई : षटकांची गती धिमी राखल्याबद्दल सामन्याच्या मानधनापैकी ६० टक्के दंड आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे सहा गुण वजा करण्याची कारवाई वेस्ट इंडिजवर करण्यात आली आहे.