South Africa T20 World Cup Squad: भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना दक्षिण आफ्रिकेने आपल्या स्क्वाडमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. संघातील प्रमुख खेळाडू टोनी डी जॉर्जी आणि डोनोवन फरेरा दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. या दोघांच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे.

टोनी डी जॉर्जी आणि डोनोवन फरेरा हे दोघेही दक्षिण आफ्रिका संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत. स्पर्धा तोंडावर असताना दोघेही संघाबाहेर होणं हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का आहे. या दोघांच्या जागी रायन रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांना संधी देण्यात आली आहे. हे दोघे वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत देखील खेळताना दिसून येणार आहेत. तर डेव्हिड मिलर पुनरागमन करणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिका संघ :

एडन मारक्रम (कर्णधार), कॉर्बीन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस,क्विंटन डी कॉक , रूबिन हरमन, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, रायन रिकल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ:

एडन मारक्रम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, रायन रिकल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.

पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत

दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. एकापेक्षा एक स्टार फलंदाजांची फौज असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. गेल्यावेळी झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिले जेतेपद पटकावण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसू शकतो.