South Africa vs South Korea Highlights: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. दरम्यान या स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दमदार खेळ करुन बलाढ्य दक्षिण कोरिया संघावर १-० ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेने आपल्या फुटबॉल इतिहासात पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील बाद फेरीत प्रवेश केला आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. कारण याआधी या संघाला फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील बाद फेरीत प्रवेश करता आला नव्हता. दोन्ही संघांमध्ये शेवटपर्यंत दमदार खेळ पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेकडून थापेलो मासेको हा विजयाचा हिरो ठरला. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. हाफ टाईमनंतर दक्षिण आफ्रिकेकडून थापेलो मासेकोने पहिला गोल केला आणि दक्षिण आफ्रिकेला १-० ने आघाडी मिळवून दिली. पहिला गोल करताच, दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात एकच जल्लोष पाहायला मिळाला. रेफ्रीने फुल टाईम झाल्याची सिटी वाजवताच दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भावुक होऊन विजयाचा आनंद साजरा करताना दिसून आले.

दुसऱ्या हाफमध्ये दक्षिण कोरियाच्या प्रशिक्षकाने आपल्या रणनीतीत बदल करत संघात ३ बदल केले. दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक हांग म्युंग- बो यांनी आपल्या संघातील स्टार खेळाडू ह्युंग- मिनला आक्रमणासाठी मैदानात उतरवलं. कोरियाकडून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर दबाव बनवण्याचं काम सुरु होतं. पण शेवटी बाजी दक्षिण आफ्रिकेनेच मारली. सामन्यातील ६३ व्या मिनिटाला तेशपांग मोरेमीने पेनल्टी बॉक्सजवळ पास दिला आणि थापेलो मासेकोने संधीचा फायदा घेत दमदार गोल केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २८ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे.

तर दुसरीकडे दक्षिण कोरियाचे खेळाडू आपल्या कामगिरीवर नाराज असल्याचे दिसून आले. दक्षिण कोरियाला अजूनही बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना टॉप ३ संघांच्या गुणांवर अवलंबून राहावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ १९९८ मध्ये पहिल्यांदा फिफा वर्ल्डकप खेळण्यासाठी पात्र ठरला होता. गेल्या ३ हंगामात हा संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी पात्र ठरला नव्हता. आता २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच राऊंड ऑफ ३२ फेरीत प्रवेश केला आहे.