Australia vs South Africa Test Series Sandpapergate Supermarket Ban: २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत वादग्रस्त घटना घडल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी संघ पुन्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. सँडपेपर गेटसारख्या मोठ्या वादानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका सुपरमार्केटने ऑस्ट्रेलियन संघाचं आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील पिक एन पे हायपरमार्केटने ३१ ऑक्टोबरपर्यंत सँडपेपरची विक्री थांबवण्याची घोषणा केली आहे. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने केलेल्या चेंडूबरोबर छेडछेड कलेल्या वादग्रस्त प्रकाराची आठवण करून देण्यासाठी सुपरमार्केटने ही खोचक खेळी केली आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू झाल्यानंतर लगेचच ही घोषणा करण्यात आली.

ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी डर्बनमधील किंग्समीड मैदानावर सुरू झाला. २०१८मधील चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा हा दक्षिण आफ्रिकेतील पहिलाच कसोटी दौरा आहे. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर जगभरातून मोठी टीका झाली होती, तर संघातील तीन खेळाडूंवर दीर्घकाळासाठी निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती.

सँडपेपरगेट प्रकरण नेमकं काय आहे?

मार्च २०१८मध्ये केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जात होता. दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीची मालिका सुरू असताना टीव्ही कॅमेऱ्यांनी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट चेंडूची स्थिती बदलण्यासाठी सँडपेपरचा वापर करत असल्याचं टिपलं.

या दृश्यांमध्ये बॅनक्रॉफ्ट चेंडूवर सँडपेपर घासत असल्याचं आणि त्यानंतर ती वस्तू लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चौकशी सुरू केली आणि लवकरच या प्रकरणाचं रूप मोठ्या राष्ट्रीय वादात झालं. त्यावेळचा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही संघाच्या नेतृत्व गटात चेंडूशी छेडछाड करण्याच्या योजनेबाबत चर्चा झाल्याची कबुली दिली. उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने ही योजना आखली होती आणि ती अमलात आणण्याची जबाबदारी बॅनक्रॉफ्टवर सोपवली होती, असं चौकशीत समोर आलं.

या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी १२ महिन्यांची बंदी घातली, तर बॅनक्रॉफ्टला नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर काही काळ नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यावरही निर्बंध घालण्यात आले होते. वॉर्नरवरील नेतृत्वविषयक निर्बंध २०२४मध्ये उठवण्यात आले.

या वादाचे परिणाम केवळ त्या तीन खेळाडूंपुरते मर्यादित राहिले नाहीत. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी मालिका संपल्यानंतर पद सोडण्याची घोषणा केली. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियन संघाची संस्कृती आणि विजय मिळवण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या पद्धतींबाबतही अस्वस्थ करणारी चर्चा सुरू झाली. या प्रकरणाला ‘सँडपेपरगेट’ असं नाव देण्यात आलं. तेव्हापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त घटनांपैकी एक म्हणून या प्रकरणाची नोंद आहे.

आठ वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एका वेगळ्या क्रिकेटविश्वात आमनेसामने आले आहेत. पॅट कमिन्स आता ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करत आहे, तर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आता त्या वेळचे कर्णधार आणि उपकर्णधार राहिलेले नाहीत. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली आहे. तरीही, जेव्हा-जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात, तेव्हा केपटाऊनमधील त्या वादग्रस्त घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.

पिक एन पे हायपरमार्केटने सँडपेपरची विक्री थांबवण्याची केलेली घोषणा हेच दाखवून देते की, त्या घटनेची आठवण आजही ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील प्रतिस्पर्धेचा एक भाग बनून राहिली आहे.