कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली आहे. या पराभवासह भारताचं आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचं स्वप्न भंगलं आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केलं. डी-कॉकने नाबाद ७९ धावा केल्या. १७ व्या षटकातच आफ्रिकेने सामन्यात बाजी मारली. तीन टी-२० सामन्यांची ही मालिका अखेरीस १-१ अशा बरोबरीत सुटली आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत दोन्ही फलंदाजांनी चिन्नास्वामी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. विशेषकरुन डी-कॉकने भारतीय गोलंदाजांवर कडवा प्रहार केला. हेंड्रिग्ज २८ धावांवर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर डी-कॉकने बावुमाच्या साथीने आफ्रिकेच्या डावाला गळती लागणार नाही याची काळजी घेत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, मोहालीच्या मैदानात आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करणारे भारतीय फलंदाज बंगळुरुच्या मैदानात पुरते अपयशी ठरले. ब्युरेन हेंड्रिग्ज, बिजॉर्न फोर्टेन यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला १३४ धावांवर रोखण्यात आफ्रिकेने यश मिळवलं. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी त्याचा हा निर्णय पुरता चुकीचा ठरवला. विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून सर्व बाजूंनी संघ तयार हवा यासाठी विविध प्रयोग करत असल्याचं कोहलीने नाणेफेकीच्यावेळी स्पष्ट केलं होतं.

सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. मात्र रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. ब्युरेन हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर रोहित झेलबाद होऊन माघारी परतला. दुसऱ्या बाजूने शिखर धवनने संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत शिखरने २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा केल्या. मात्र तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर शिखर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन माघारी परतला.

दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीलाही खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी बराच वेळ लागला. अखेरीस रबाडाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न करताना विराट सीमारेषेवर फेलुक्वायोकडे झेल देत माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि ऋषभ पंत यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फोर्टेनने एकाच षटकात दोघांचा बळी घेत भारताला बॅकफूटवर ढकललं. अखेरीस रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला १३४ धावांचा टप्पा गाठून दिला. अखेरच्या षटकात रविंद्र जाडेजाही रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ३, फोर्टेन, आणि ब्युरेन हेंड्रिग्जने २ तर तबरेज शम्सीने १ बळी घेतला.

Live Blog

22:07 (IST)22 Sep 2019
दक्षिण आफ्रिकेची सामन्यात बाजी, भारतावर ९ गडी राखून मात

मालिकेत १-१ ने बरोबरी, कर्णधार क्विंटन डी-कॉकचं सामन्यात नाबाद अर्धशतक

21:41 (IST)22 Sep 2019
कर्णधार क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक

आफ्रिकेची विजयी लक्ष्याच्या दिशेने वाटचाल

21:39 (IST)22 Sep 2019
रेझा हेंड्रिग्जला माघारी धाडण्यात भारताला यश

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला झेल

21:30 (IST)22 Sep 2019
आफ्रिकन सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

क्विंटन डी-कॉक आणि रेझा हेंड्रिग्ज यांची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

20:40 (IST)22 Sep 2019
भारताची १३४ धावांपर्यंत मजल

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १३५ धावांचं आव्हान

20:36 (IST)22 Sep 2019
लागोपाठ हार्दिक पांड्या माघारी, भारताला नववा धक्का

रबाडाच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरने घेतला पांड्याचा झेल

20:35 (IST)22 Sep 2019
चोरटी धाव घेताना वॉशिंग्टन सुंदर माघारी, भारताला आठवा धक्का

कगिसो रबाडाच्या अचूक फेकीने भारताचा आठवा फलंदाज तंबूत परतला

20:32 (IST)22 Sep 2019
अखेरच्या षटकात रविंद्र जाडेजा माघारी

कगिसो रबाडाने घेतला बळी, भारताला सातवा धक्का

20:12 (IST)22 Sep 2019
कृणाल पांड्या माघारी, भारताला सहावा धक्का

ब्युरेन हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉकने घेतला झेल

20:04 (IST)22 Sep 2019
पाठोपाठ श्रेयस अय्यरही माघारी

फोर्टनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यर यष्टीचीत

भारताचा निम्मा संघ माघारी, मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून निराशा

20:03 (IST)22 Sep 2019
ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी, भारताला चौथा धक्का

उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात फेलुक्वायोकडे झेल देऊन पंत बाद

19:41 (IST)22 Sep 2019
कर्णधार विराट कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का

कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना विराट सीमारेषेवर झेल देऊन माघारी

19:37 (IST)22 Sep 2019
धवनला माघारी धाडण्यात आफ्रिका यशस्वी

तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना शिखर धवन झेलबाद, २५ चेंडूत ३६ धावांची खेळी

टी-२० क्रिकेटमध्ये शिखरने ओलांडला ७ हजार धावांचा टप्पा

19:14 (IST)22 Sep 2019
भारताची सलामीची जोडी फोडण्यात आफ्रिका यशस्वी, रोहित माघारी

ब्युरेन हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर रेझा हेंड्रिग्जकडे झेल देत रोहित माघारी

८ चेंडूत २ चौकारांच्या सहाय्याने रोहितच्या ९ धावा

18:37 (IST)22 Sep 2019
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा अंतिम ११ जणांचा संघ...
18:37 (IST)22 Sep 2019
असा आहे भारताचा अंतिम ११ जणांचा संघ...
18:36 (IST)22 Sep 2019
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

अंतिम सामन्यासाठीही भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत