WTC Points Table After SA vs AUS 3rd Test: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. केप टाऊनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर १७६ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ ने खिशात घातली. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने टॉप २ मध्ये आपलं स्थान आणि भक्कम केलं आहे.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २८८ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना कगिसो रबाडा आणि सायमन हार्मरच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. सायमन हार्मरने या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर रबाडाने ३ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना अवघ्या ४२ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. कॅमरून ग्रीनने २७ तर ट्रॅव्हिस हेडने १४ धावा केल्या. यादरम्यान ४ फलंदाज तर शून्यावर बाद होऊन माघारी परतले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला.

या पराभवाचा ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ७५ वरून घसरली असून ६९.२३ वर जाऊन पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर सामना जिंकूनही दक्षिण आफ्रिकेला टक्केवारीत मोठी झेप घेता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेची विजयाची सरासरी ६६.६७ वरून ७१.४२ वर जाऊन पोहोचली आहे. तर न्यूझीलंडचा संघ ७२.२२ टक्केवारीसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ ५१.५२ विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानी आहे.

भारतीय संघाकडे गुणतालिकेत वर जाण्याची संधी

भारतीय संघाचा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची ५ वनडे सामन्यांची मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. जर भारतीय संघाला गुणतालिकेतील आपली स्थिती मजबूत करायची असेल, तर न्यूझीलंडला तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत करावं लागणार आहे.