ब्लोमफॉन्टेन : रासी व्हॅन डर डसेनचे (११७ चेंडूंत १११ धावा) शतक, तसेच आनरिख नॉर्किए (४/६२) व सिसांडा मगाला (३/४६) यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर २७ धावांनी मात केली.
या सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २९८ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव ४४.२ षटकांत २७१ धावांत आटोपला. त्यामुळे आफ्रिकेने हा सामना जिंकत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.
आफ्रिकेच्या डावाची क्विंटन डिकॉक (३७) आणि कर्णधार टेम्बा बव्हुमा (३६) यांनी आक्रमक सुरुवात केली. हे दोघे बाद झाल्यावर डसेनने एक बाजू लावून धरताना एकदिवसीय कारकीर्दीतील चौथे शतक झळकावले. त्याला हेन्रिक क्लासन (३०) आणि डेव्हिड मिलर (५३) यांची चांगली साथ लाभली.
२९९ धावांचा पाठलाग करताना जेसन रॉय (११३) आणि डेव्हिड मलान (५९) यांनी इंग्लंडसाठी १४६ धावांची सलामी दिली. अखेर मलानला मगालाने बाद करत ही जोडी फोडली. मग रॉयही बाद झाल्यानंतर जोस बटलर (३६) वगळता इतरांना फारसे योगदान देता आले नाही.