केप टाऊन : जसप्रीत बुमराच्या (४२ धावांत ५ बळी) भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. बुमरा, मोहम्मद शमी (२/३९), उमेश यादव (२/६४) आणि शार्दूल ठाकूर (१/३७) या वेगवान चौकडीने आफ्रिकेला पहिल्या डावात २१० धावांत रोखून तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताला १३ धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने दोन्ही सलामीवीरांना गमावून ५७ धावांपर्यंत मजल मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात १ बाद १७ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ करणाऱ्या आफ्रिकेला बुमराने पहिला धक्का देताना एडिन मार्करमची (८) उजवी यष्टी वाकवली. केशव महाराजने संयमी फलंदाजी करीत २५ धावा केल्या. पण उमेश यादवच्या आत वळलेल्या चेंडूने त्याची मधली यष्टी भेदली.

आफ्रिकेला ३ बाद ४५ अशा स्थितीतून कीगन पीटरसनने दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या करीत सावरले.  पीटरसनने १६६ चेंडूंत ९ चौकारांसह ७२ धावांची चिवट खेळी साकारली. पीटरसनने सर्वप्रथम रॅसी व्हॅन डर दुसेनच्या (२१) साथीने चौथ्या गडय़ासाठी ६७ धावांची भागीदारी केली. दुसेनचा अडथळा उमेशनेच दूर केला. विराट कोहलीने दुसऱ्या स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. मग पीटरसनने तेंबा बव्हुमाच्या (२८) साथीने पाचव्या गडय़ासाठी ४७ धावांची भागीदारी केली. शमीचे ५६वे षटक भारताच्या दृष्टीने निर्णायक ठरले. शमीने एका चेंडूच्या अंतराने बव्हुमा आणि कायले व्हेरेन्ने (०) यांना अनुक्रमे कोहली आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांच्याद्वारे झेलबाद करीत आफ्रिकेच्या डावाला िखडार पाडले. बुमराने स्थिरावण्यापूर्वीच मार्को जॅन्सनचा (७) त्रिफळा उडवला. मग बुमराने पुढच्याच षटकात आफ्रिकेकडून चिवट झुंज देणाऱ्या पीटरसनला चेतेश्वर पुजाराद्वारे झेलबाद करीत भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले.  मग शार्दूल ठाकूरने कॅगिसो रबाडाला (१५) तंबूत धाडले. लुंगी एन्गिडी एक्स्ट्रा कव्हरला रविचंद्रन अश्विनकडे सोपा झेल देऊन माघारी परतल्यामुळे बुमराच्या खात्यावर पाचवा बळी जमा झाला आणि आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आला.

मग भारताने २ बाद ५७ धावांपर्यंत मजल मारत एकूण ७० धावांची आघाडी घेतली आहे. के. एल. राहुल (१०) आणि मयांक अगरवाल (७) यांची सलामी जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. मात्र २ बाद २४ धावांवरून कर्णधार विराट कोहली (खेळत आहे १४) आणि चेतेश्वर पुजारा (खेळत आहे ९) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ३३ धावांची भर घालून भारताचे दिवसावरील वर्चस्व कायम राखले.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : २२३

’ दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ७६.३ षटकांत सर्व बाद २१० (कीगन पीटरसन ७२, तेम्बा बव्हूमा २८; जसप्रीत बुमरा ५/४२, मोहम्मद शमी २/३९)

’ भारत (दुसरा डाव) : १७ षटकांत २ बाद ५७ (विराट कोहली खेळत आहे १४, के. एल. राहुल १०; मार्को जॅन्सन १/७)

कोहली, रोहितचे स्थान कायम

दुबई : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचे फलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीतील स्थान कायम आहे. पाचव्या स्थानी असलेल्या रोहितच्या खात्यात ७८१ गुण असून कोहली ७४० गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. मयांक अगरवालची एका स्थानाने घसरण झाली आहे. तो आता ६९८ गुणांसह १३व्या क्रमांकावर आहे.

वॉशिंग्टनची माघार; जयंत, सैनीचा समावेश

मुंबई : करोनाची लागण झाल्यामुळे भारताचा ऑफ-स्पिनर वॉिशग्टन सुंदरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी जयंत यादवचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या दुखापतीतून अद्याप सावरला नसल्याने नवदीप सैनीला पर्यायी वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa vs india 3rd test jasprit bumrah picked up a 5 wicket zws
First published on: 13-01-2022 at 03:27 IST