मुंबई : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात मंगळवारी भारतावर ४०८ धावांनी विजय मिळवून कसोटी चॅम्पियन असल्याचे पुन्हा सिद्ध केले. भारतासाठी हा सर्वांत दारुण पराभव येथील कसोटी क्रिकेट ‘गंभीर’ वळणावर पोहोचल्याचेच दाखवून देतो. गेल्या काही महिन्यांत घरच्या मैदानावर टीम इंडियाला मिळालेला हा दोन वर्षांतील दुसरा ‘व्हाइटवॉश’. त्यामुळे भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याची रणनीती आणि अष्टपैलूंसाठीचा अट्टहास टीकेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्याने भारतीय संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून १९ कसोटी सामन्यांतील टीम इंडियाचा हा दहावा पराभव ठरला.
२०१२ ते २०२४ या १२ वर्षांत भारताने घरच्या मैदानावर कसोटीमध्ये केवळ पाच पराभव पाहिले. तितकेच पराभव भारताला गेल्या १२ महिन्यांत पत्करावे लागले! दोन वर्षांमध्ये दोन कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की तर तब्बल ४० वर्षांनी भारतावर ओढवली.
जायबंदी कर्णधार शुभमन गिलविना खेळणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात किंबहुना मालिकेतील दोन्ही कसोटींमध्ये लढण्याची जिद्दही दाखवता आली नाही. संघनिवड, स्थिरतेचा अभाव, अष्टपैलू खेळाडूंवरील अवलंबित्व यांचा फटका भारताला बसला. ऋषभ पंत हंगामी कर्णधार असल्याने संघाच्या फसलेल्या व्यूहरचनेबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीरकडे बोट दाखवले जात आहे. गेल्या दीड वर्षांतील भारताच्या कसोटी कामगिरीचे आकडेही तेच दाखवतात.
गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने इंग्लंडमधील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या दुबळ्या संघांवर विजयही मिळवला. मात्र, घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३ असा पराभव भारतासाठी धक्कादायक ठरला. याशिवाय भारताला ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर करंडक गमवावा लागला. आता, २५ वर्षांनंतर भारतीय संघ आपल्या मायभूमीत दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभूत झाला.
गंभीरच्या नेतृत्वात भारताने ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक आणि आशिया चषक उंचावला असला, तरीही कसोटी क्रिकेटचा स्तर खालाविल्याचे चित्र सध्या आहे. अनेक माजी भारतीय-विदेशी क्रिकेटपटूंनी भारताच्या या सुमार कामगिरीसाठी संघनिवड आणि व्यूहरचना यांना जबाबदार ठरवले आहे. खुद्द गंभीरने मात्र पराभवाचे विश्लेषण करताना ‘भारतीय संघ सध्या संक्रमणावस्थेत आहे. अनेक खेळाडू नवोदित आहेत’ असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले. ‘कसोटी संघात मर्यादित कौशल्य पण कणखर मनोवृत्ती असलेले खेळाडू असायला हवेत’ असे सांगत त्याने अष्टपैलू खेळाडूंच्या निवडीमागच्या आपल्या भूमिकेचे अप्रत्यक्ष समर्थनच केले. माझ्या भविष्याबाबत ‘बीसीसीआय’ निर्णय घेईल, असे त्याने म्हटले आहे.
प्रशिक्षकांची कामगिरी
गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताची विजयाची टक्केवारी ३६.८२ अशी आहे. ही आतापर्यंतची दुसरी सुमार कामगिरी आहे. डंकन फ्लेचर यांच्या प्रशिक्षक काळात भारताला ३९ कसोटीत १७ सामने गमवावे लागले होते. त्यांची टक्केवारी ३३.३३ अशी होती.
सामने विजय पराभव अनिर्णित
गौतम गंभीर १९ ७ १० २
राहुल द्रवीड २४ १४ ७ ३
रवी शास्त्री ४३ २५ १३ ५
सांघिक अडचणी
– तिसऱ्या क्रमांकासाठी विशेषज्ञ फलंदाजाची कमतरता
– फिरकीचा सामना करण्यात फलंदाज अपयशी
– रोहित, विराट, अश्विनच्या निवृत्तीनंतर अनुभवाची कमतरता. – सामन्यागणिक संघात क्रमबदल.
