२५ ऑक्टोबर २०१५ या दिवशी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ऐतिहासिक एकदिवसीय सामन्याचे कवित्व अजूनही टिकून आहे, याचीच प्रचीती शनिवारी वानखेडेवर झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका सराव सामन्याला आली. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या मुख्य फेरीला प्रत्यक्षात सुरुवात होण्यापूर्वीच्या या सराव सामन्याला मुंबईकर क्रिकेटरसिकांनी ‘हाऊसफुल’ गर्दी केली. विश्वचषक साखळीत मुंबईच्या वाटय़ाला भारताचा सामना आलेला नाही. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामनाच वानखेडेवर होण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीत भारतीय संघाचा सामना पाहायची ही संधी न दवडण्याचाच निर्धार जणू चाहत्यांनी केल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षी वानखेडेवर झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याने ‘त्या’ पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा निकाल लागला होता; परंतु यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे दक्षिण आफ्रिकेने ४ बाद ४३८ धावांचा डोंगर उभारला होता. यात क्विंटन डी कॉक, फॅफ डू प्लेसिस आणि ए बी डी’व्हिलियर्स यांच्या शतकांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून क्रिकेटरसिकांची मने जिंकली होती. ‘एबी.. एबी..’ हा नाद त्या वेळी  घुमला होता. त्यानंतर भारताचा डाव २२४ धावांत आटोपला होता.

शनिवारी ‘विक एंड’चा दिवस असल्याने वानखेडेवरील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची तिकिटे मिळावीत म्हणून सकाळपासूनच परिसरातील तिकीट खिडक्यांवर चाहत्यांची रीघ लागली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून  सकाळी नऊ वाजल्यापासून १००, २०० आणि ५०० रुपये दराची तिकिटे उपलब्ध करण्यात आली होती. सराव सामना असला तरी चालेल, पण भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची अदाकारी पाहावी, या हेतूने ही रांग चर्चगेट स्थानकाबाहेरील रस्त्यावर लांबपर्यंत गेली होती. त्यामुळेच वानखेडे जवळपास चाहत्यांच्या गर्दीमुळे बहरून गेले होते. चौकार-षटकाराला मिळणारी दाद, खेळाडूंच्या नावांचा जयघोष यामुळे या सराव सामन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. दोन्ही संघांतील खेळाडूंनीही आपल्या कामगिरीने त्यांच्या अपेक्षांची पूर्तता केली.

‘‘जानेवारी महिन्यात वानखेडेवर झालेल्या बडोदा विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातील मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्याला चाहत्यांनी चांगली गर्दी केली होती. त्या वेळी क्रिकेटरसिकांना तो मोफत ठेवण्यात आला होता. परंतु भारत-दक्षिण आफ्रिका सराव सामन्याला यापेक्षा जास्त गर्दी होणार हे आम्हाला अपेक्षित होते. मोफत सामन्याला गर्दीचे प्रमाण खूप वाढले तर चेंगराचेंगरी होण्याचा धोका असतो. म्हणून त्या सामन्यातून धडा घेत आम्ही तिकीटदर आकारण्याचा निर्णय घेतला आणि स्टेडियममध्ये एकाच प्रवेशद्वारातून सोडण्यात आले,’’ अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव उन्मेष खानविलकर यांनी दिली.