दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी २० सामन्यामध्ये दिनेश कार्तिकने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याला ज्या कामासाठी भारतीय संघात पुन्हा स्थान देण्यात आले होते, ते त्याने इमानेइतबारे पुर्ण केले. कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावत भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक प्रभावित केले आहे. अगदी विरोधी संघातील खेळाडूही दिनेश कार्तिकचे चाहते झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने दिनेश कार्तिकची स्तुती केली आहे.

दिनेश कार्तिकचे कौतुक करताना केशव महाराज म्हणाला, “दिनेश जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याची भूमिका चोख बजावत आहे. तो नक्कीच खेळातील सर्वोत्तम ‘फिनिशर्स’पैकी एक आहे. ज्याठिकाणी धावा जमा करणे कठिण आहे अशा ठिकाणी तो धावा गोळा करतो. त्यामुळेच त्याच्या विरोधात गोलंदाजी करणेही कठीण जात आहे.”

हेही वाचा – IND vs SA T20 Series: घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकून ‘पंतसेना’ इतिहास रचणार का?

चौथ्या टी २० सामन्यानंतर महाराज म्हणाला, “तो आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आपला अनुभव आणि कौशल्या दाखवत चांगला खेळ केला. शिवाय, आता मालिका निर्णायक स्थितीमध्ये पोहचली आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात फार मजा येईल.”

चौथ्या टी २० सामन्यात भारतीय संघ संकटात असताना दिनेश कार्तिकने २७ चेंडूत ५५ धावा केल्या होत्या. २००६ मध्ये टी २० पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिकचे हे पहिलेच अर्धशतक होते. पाचव्या सामन्यात चाहत्यांना दिनेश कार्तिककडून फार अपेक्षा आहेत.