दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्डन हरमनने पदार्पणाच्या लढतीत ऐतिहासिक खेळी साकारली. नामिबियाविरुद्ध विंडहोक इथे झालेल्या लढतीत जॉर्डनने पदार्पणाच्या लढतीचं दडपण झुगारून देत १५० धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने तब्बल १७ चौकार आणि ३ षटकार लगावले.

योगायोग म्हणजे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या लढतीत सर्वाधिक धावा करण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्क्झच्या विक्रमाची जॉर्डनने बरोबरी केली. मॅथ्यूने गेल्या वर्षी १० फेब्रुवारी २०२५ मध्ये लाहोर इथल्या गदाफी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणात १५० धावांची खेळी केली होती.

पदार्पणात सर्वाधिक धावांच्या यादीत या दोघांपाठोपाठ वेस्ट इंडिजचे महान फलंदाज डेसमंड हेन्स यांचं नाव आहे. त्यांनी १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंट जॉन्स अँटिंगा इथे १४८ धावांची खेळी केली होती.

जॉर्डनला टोनी द झोरीने ७२ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. त्याने ८४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी सजवली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी केली. शतकानंतरही जॉर्डनने चांगला खेळ सुरुच ठेवला. दीडशतकानंतर एक धाव झाली असती तर विश्वविक्रम जॉर्डनच्या नावावर झाला असता मात्र ट्रम्पलमॅनने त्याची खेळी संपुष्टात आणली.

डेवाल्ड ब्रेव्हिसने ३३ तर कार्बिन बॉशने ३९ धावांची खेळी केली. आफ्रिकेने ३४८ धावांचा डोंगर उभारला. नामिबियातर्फे रुबेन ट्रम्प्लमॅनने ४ विकेट्स घेतल्या. या प्रचंड लक्ष्यासमोर खेळताना नामिबियाची दमछाक झाली आणि त्यांनी नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. मलान क्रुगरने ३४ तर जे स्मूटने ३१ धावा केल्या. नामिबियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे प्रेनलन सुब्रयानने ४ विकेट्स घेतल्या.

जॉर्डनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याच सामन्यात जॉर्डनचा भाऊ रुबिन हरमनही खेळला. २९ वर्षीय रुबिन विकेटकीपर बॅट्समनच्या भूमिकेत आहे.