Marizanne Kapp Post For Anaya Bangar: भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनायाला क्रिकेटवर किती प्रेम आहे हे तिने अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करुन व्यक्त केलं आहे. अनेकदा ती क्रिकेट खेळतानाही दिसून आली आहे. लिंग पुष्टीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर ती क्रिकेटच्या मैदानापासून दूर होती. पण आता ती पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. यावेळी ती उच्च स्तरावर क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. तिला ऑस्ट्रेलियामध्ये कम्युनिटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे.यासह ती ऑस्ट्रेलियातील वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेसाठीही पात्र ठरु शकते. यावरुन दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मॅरिझान कॅपने विरोध करत मोठं वक्तव्य केलं आहे.
अनाया बांगरने पत्रकार परिषद घेऊन ऑस्ट्रेलियातील महिला कम्युनिटी क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली. अनाया म्हणाली की, “हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, विशेषतः मी पुन्हा क्रिकेट खेळू शकते हे समजल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. एक वेळ अशी आली होती की मी पुन्हा कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही, असं मला वाटलं होतं. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार, त्यांनी मला पुन्हा एक संधी दिली.”
पण दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मॅरिझान कॅपला हा निर्णय मुळीच आवडलेला नाही. मॅरिझान कॅपने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अनाया बांगरची पोस्ट शेअर केली आहे. यासह तिने आपलं मत देखील मांडलं आहे. ती तिने या पोस्टवर कॅप्शन देत लिहिले की, “हा निव्वळ मूर्खपणा आहे.. या गोष्टीसाठी अजिबात परवानगी दिली जाऊ नये!” क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयानंतर या विषयावर मत मांडणारी मॅरिझान कॅप ही पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे. आणखी काही महिला क्रिकेटपटू याबाबत आपलं मत मांडू शकतात.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनायाच्या पत्रावर काय उत्तर दिलं?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या Transgender and Gender Diverse Players in Elite Cricket Policyनुसार, एलिट क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी खेळाडूच्या रक्तातील सीरम टेस्टोस्टेरॉनची पातळी किमान १२ महिने १० nmol/L (नॅनोमोल्स प्रति लिटर) पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. दरम्यान, २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुषत्वाच्या वयात (male puberty) प्रवेश केलेल्या ट्रान्सजेंडर खेळाडूंना एलिट महिला क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली होती.
दरम्यान, अनायाच्या पत्राला उत्तर देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी विभागाच्या प्रमुख जॅकी पॅट्रिज यांनी सांगितलं की, मार्च २०२७ पर्यंत अनाया ऑस्ट्रेलियातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रीमियर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास पात्र असेल. प्रीमियर क्रिकेटला ‘एलिट क्रिकेट’ऐवजी ‘कम्युनिटी क्रिकेट’ म्हणून वर्गीकृत करण्यात आल्याने त्यात खेळण्यावर या धोरणाचा परिणाम होणार नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाबद्दल अनायाने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “मला पुन्हा क्रिकेट खेळता येईल, यावर मला विश्वास होत नव्हता. ट्रान्स महिलांच्या महिला क्रिकेटमधील सहभागाबाबत निष्पक्षता आणि समावेशकतेवर भर देणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रगतीशील धोरणांमुळे ही माझ्यासाठीच नव्हे, तर माझ्यासारख्या इतर खेळाडूंसाठीही मोठी गोष्ट आहे. अनेकांना खेळ किंवा लिंग-बदल प्रक्रिया यापैकी एकाची निवड करावी लागते, त्यामुळे ते खेळात सहभागी होण्याचा प्रयत्नही करत नाहीत.”
