Korea enters the knockout stages, but despite winning, Uruguay is out of the World Cup | Loksatta

FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर

आशा-निराशेच्या खेळात मोक्याच्या क्षणी दक्षिण कोरियाने पोर्तुगालवर बाजी मारत एकाच वेळेस घाना आणि उरुग्वेला फिफा विश्वचषकातून बाहेर केले.

FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर
सौजन्य- फिफा विश्वचषक २०२२ (ट्विटर)

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी (२ डिसेंबर) पोर्तुगालचा सामना दक्षिण कोरियाशी झाला. एच गटात कोरियाने पोर्तुगालवर २-१ अशी मात करत या विजयासह त्यांचे तीन सामन्यांतून चार गुण झाले. या विजयासह त्यांनी गटात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत अंतिम-१६ मध्ये पोर्तुगालसोबत स्थान मिळवले. पोर्तुगाल तीन सामन्यांत सहा गुणांसह गटात अव्वल स्थानावर असून ते आधीच बाद फेरीत पोहचले आहेत.

आशा-निराशेच्या खेळात मोक्याच्या क्षणी दक्षिण कोरियाने पोर्तुगालवर बाजी मारत एकाच वेळेस घाना आणि उरुग्वेला फिफा विश्वचषकातून बाहेर केले. दक्षिण कोरियाने बलाढ्य पोर्तुगालचा २-१ असा पराभव करत विश्वचषकातील अपसेट खेचून आणला. कोरियाचा संघ २०१० नंतर प्रथमच अंतिम-१६ मध्ये पोहोचला आहे. तर तिकडे घाना विरुद्ध २-० असा विजय मिळवूनही गोलच्या फरकामुळे त्यांना त्याच एच गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २० वर्षानंतर पहिल्यांदाच माजी विश्वविजेते उरुग्वेला साखळी सामन्यातून बाहेर पडावे लागले.

निर्धारित ९० मिनिटांनंतर दुखापतीच्या वेळेत कोरियाने आघाडी घेतली. त्याने ९०+१व्या मिनिटाला गोल केला. मोक्याच्या क्षणी कोरियाच्या ह्वांग ही चॅनने शानदार गोल करत एकाच वेळेस घाना आणि उरुग्वेला बाहेर काढले. त्याचा हा जादुई गोल एका अर्थाने जादू करत दक्षिण कोरियाला अंतिम-१६ मध्ये स्थान मिळवून देऊन गेला. पूर्वाधात या पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात दक्षिण कोरियाने शानदार पुनरागमन केले आहे. त्याने २७ व्या मिनिटाला पहिला गोल केला. दक्षिण कोरियासाठी पहिला गोल किम एंग ग्वॉनने केला. गेल्या विश्वचषकातही त्याने जर्मनीविरुद्ध पहिला गोल केला होता.

तत्पूर्वी, दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या संघाने धमाका केला. त्याच्यासाठी रिकार्डो होर्टाने पाचव्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. होर्टाने २०१४ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्या सामन्यानंतर आज त्याला संधी मिळाली आणि त्याने गोल केला. मात्र तो एकच गोल संपूर्ण सामन्यात पोर्तुगालकडून झाला. उत्तराधार्त सामन्याची ८० मिनिटे झाली तेव्हा निर्धारित ९० पैकी फक्त १० मिनिटे शिल्लक असताना कोरियाने वेग वाढवत पोर्तुगालवर दबाव टाकला आणि त्याचाच परिपाक म्हणून दबावात आलेल्या रोनाल्डोच्या संघाने एक गोल स्वतः वर ओढवून घेत सामना गमावला.

घाना विरुद्ध उरुग्वे

दोन वेळचा चॅम्पियन संघ उरुग्वे विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यांनी त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात घानाला २-० ने पराभूत केले, परंतु ते त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते. अन्य गटातील लढतीत दक्षिण कोरियाने पोर्तुगालचा २-१ असा धुव्वा उडवला. कोरियन संघाने बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर उरुग्वेचा संघ २० वर्षांनंतर प्रथमच बाद फेरी गाठू शकलेला नाही. २००२ मध्ये ते गट टप्प्यात शेवटच्या वेळी बाहेर पडले होते. २००६ मध्ये तो वर्ल्डकपसाठीही पात्र ठरू शकला नव्हता. त्यानंतर २०१० मध्ये तो चौथ्या क्रमांकावर होता. २०१४ मध्ये ते उपउपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडले आणि २०१८ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले.

१४ वा विश्वचषक खेळणारा उरुग्वेचा संघ चौथ्यांदा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. यापूर्वी १९६२, १९७४ आणि २००२ मध्ये उरुग्वेला बाद फेरी गाठता आली नव्हती. एक विजय, एक अनिर्णित आणि एक बरोबरी यासह उरुग्वेने एच गटात चार गुणांसह तिसरे स्थान पटकावले. उरुग्वेचा हा विश्वचषकातील घानावरचा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी २०१० मध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव झाला होता.

घानाच्या संघाने अल झैनाब स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना जिंकला असता तर सहा गुणांसह दुसरे स्थान मिळवून बाद फेरी गाठली असती. उरुग्वेचा खेळाडू डार्विन नुनेजला चूक केल्याबद्दल पिवळे कार्ड दाखवण्यात आले. १९व्या मिनिटाला वॉरने घानाला पेनल्टी दिली. आंद्रे आय्यूचा फटका गोलरक्षक रोशेटने वाचवला. घानाने ही पेनल्टी चुकवली नसती तर त्यांना वाढ करण्याची संधी मिळाली असती. यानंतर अरस्केटाने २६व्या आणि ३२व्या मिनिटाला गोल करत उरुग्वेला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 23:23 IST
Next Story
समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल!