चेक प्रजासत्ताकवर विजय ; इनिइस्टाची प्रभावी साथ

बार्सिलोना क्लबतर्फे खेळणाऱ्या गेरार्ड पिकने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत चेक प्रजासत्ताकविरुद्ध सलामीच्या लढतीत ८७व्या मिनिटाला गोल करत स्पेनला १-० थरारक विजय मिळवून दिला.

स्पर्धेसाठी सराव शिबीर सुरू असतानाच गोलरक्षक डी गीआ एका लैंगिक प्रकरणात सहभागी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र प्रशिक्षक व्हिन्सेंट डेल बॉस्क यांनी डी गीआ याच्यावरचा विश्वास कायम ठेवत त्याला संघात समाविष्ट केले. या निर्णयामुळे अव्वल गोलरक्षक इकर कॅसिलसला विश्रांती देण्यात आली.

डेल बॉस्क यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या स्पेनच्या संघाला रोखण्यासाठी आम्ही चमत्कृती डावपेच आखू, असे चेक प्रजासत्ताकचे प्रशिक्षक पाव्हेल व्हर्बा यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष सामन्यात त्याचा प्रत्यय आला नाही. चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंनी बचावावर भर देत स्पेनच्या आघाडीपटूंना तंगवले. निर्धारित वेळ संपण्यासाठी तीन मिनिटे असताना पिकने आंद्रेस इनिइस्टाच्या पासवर सुरेख हेडर करत स्पेनचे खाते उघडले. शेवटच्या मिनिटाला चेक प्रजासत्ताकच्या व्लादिमीर दारिदाने गोलसाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र स्पेनचा गोलरक्षक डी गा याने हा प्रयत्न रोखला. सामना गोलशून्य बरोबरीत सुटणार असे चित्र असताना पिकने केलेल्या गोलच्या बळावर स्पेनने बाजी मारली.

युरो स्पर्धेत स्पेनने आतापर्यंत एकदाही सलामीचा सामना गमावलेला नाही. चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या विजयासह स्पेनने ही परंपरा कायम राखली. अल्वारो मोराटा, जॉर्डी अल्बा आणि डेव्हिड सिल्व्हा यांनी सातत्याने गोलसाठी प्रयत्न केले. मात्र चेकच्या बचावापुढे ते अपुरे ठरले.

२०१४च्या विश्वचषकात स्पेनला प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. या स्पर्धेसाठी आयोजित सराव सामन्यात जागतिक क्रमवारीत १३७व्या स्थानी असणाऱ्या जॉर्जिआने त्यांना नमवले होते. मात्र गोल करण्याची त्यांची क्षमता सर्वश्रुत आहे. चेकविरुद्धच्या लढतीत पहिल्या सत्रात स्पेनने ७४ टक्के चेंडूवर नियंत्रण राखले आणि ३७८ वेळा चेंडूला पास करत सोपवला. मोराटाने स्पेनच्या आक्रमणाची धुरा वाहिली. मात्र चेकच्या बचावाला भेदण्याची क्लृप्ती त्यांच्याकडे नव्हती.

२००४मध्ये पोर्तुगालविरुद्धच्या पराभवानंतर युरो स्पर्धेत अंतिम फेरीत स्पेनने एकही लढत गमावलेली नाही. युरो स्पर्धेत गोल होऊ न देता स्पेनने ६०० मिनिटे खेळ केला आहे.

चेक आणि स्पेन दोन तुल्यबळ संघ आहेत. त्यामुळे सहजासहजी गोल होणे शक्यच नव्हते. गोल होईपर्यंत टक्कर देत राहणे एवढेच आमच्या हाती होते. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये गोल झाला. पण त्याची चिंता नव्हती. संयमाची परीक्षा पाहणारा सामना होता.

-आंद्रेस इनिइस्टा, स्पेनचा कर्णधार