Spain Breaks Australia Record: स्पेन म्हटलं की सर्वांना फुटबॉल आठवतं. कारण स्पेनने काही दिवसांपूर्वीच बलाढ्य अर्जेंटिनाला फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत करुन वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. पण स्पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघ ऑस्ट्रेलियाचा लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? अनेकांचं उत्तर नाहीच असेल. पण असं खरोखर घडलं आहे. स्पेनने लागोपाठ २४ आंतरराष्ट्रीय सामने जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

स्पेनचा संघ फिनलँडमध्ये सुरू असलेली आयसीसी टी-२० वर्ल्डकप सब रिजनल यूरोप क्वालिफायर स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. याआधी १४ ऑगस्टला झालेल्या सामन्यात स्पेन आणि फिनलँड हे दोन्ही संघ आमनेसामेन आले होते. हा सामना जिंकून स्पेनने ऑस्ट्रेलियाचा लागोपाठ सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम मोडून काढला होता. त्यानंतर बुल्गारिया, लक्जमबर्ग आणि आईल ऑफ मॅन या संघांना हरवल्यानंतर स्पेनने लागोपाठ २४ सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

स्पेनने मोडला ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहे. पण ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने हा रेकॉर्ड बनवला होता, त्यावेळी रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने कसोटी आणि वनडे मिळून एकूण २० सामने जिंकले होते. हा पराक्रम ऑस्ट्रेलियाने २००३ मध्ये करुन दाखवला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह ऑस्ट्रेलियाचा विजयरथ थांबला होता.

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा रेकॉर्ड हा अजूनही ऑस्ट्रेलियाच्या नावे कायम आहे. पण एकूण आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा रेकॉर्ड स्पेनच्या नावावर आहे. पाँटिंगच्या नेतृत्वात खेळताना ऑस्ट्रेलियाने लागोपाठ १७ वनडे आणि ३ कसोटी सामने जिंकले होते. आता स्पेनचा संघ या रेकॉर्डमध्ये खूप पुढे निघून गेलेला नाही. तसेच भारतीय संघाच्या नावे लागोपाठ सर्वाधिक १२ सामने जिंकण्याची नोंद आहे. २०१७ मध्ये भारतीय संघाने लागोपाठ १२ सामने जिंकले. पण १३ व्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.