Spain Cricket Team 21 Consecutive T20 Wins Record vs Australia: स्पेनने २०२६ फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध दमदार विजय मिळवत फुटबॉलमध्ये आपला दबदबा कायम ठेवला असतानाच आता क्रिकेटमध्येही संघाने विश्वविक्रम केला आहे. स्पेनने ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वविक्रम मोडत आपल्या नावे केला आहे. २०२८ टी-२० वर्ल्डकपसाठीच्या युरोप सब-रिजनल क्वालिफायर सी स्पर्धेत स्पेनने शुक्रवारी यजमान फिनलँडचा ८ विकेट्सने पराभव केला. १३२ धावांचं लक्ष्य स्पेनने सहज पार करत सलग २१वा विजय नोंदवला आणि क्रिकेटच्या इतिहासात विशेष स्थान मिळवलं.

ICCच्या पुरुष टी-२० क्रमवारीत २८व्या स्थानावर असलेल्या स्पेनचा हा सलग २१वा विजय आहे. तीन वर्षांपूर्वी आयल ऑफ मॅनविरुद्धच्या विजयापासून त्यांची ही विजयी घोडदौड सुरू झाली. या काळात स्पेनने जर्सी, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, ग्रीस आणि फिनलँडसारख्या युरोपीय संघांनाही पराभूत केलं आहे. विशेष म्हणजे, स्पेन हा अजूनही क्रिकेटमधील विकसनशील असोसिएट देश आहे. मात्र सलग विजयांच्या या विक्रमी मालिकेमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज क्रिकेट संघाचा विक्रम मागे टाकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

स्पेनचा संघ हा सलग विजयांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम मोडत क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला. स्पनने ३ वर्षांमध्ये सलग २१ विजय मिळवत नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. या २१व्या विजयासह स्पेनने २००३ मधील बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा सलग विजयांचा विक्रम मागे टाकला. त्यावेळी रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने कॅलेंडर वर्षाची सुरुवात सलग १७ वनडे विजयांसह केली होती. या विजयी मालिकेत त्यांनी वर्ल्डकप जिंकला आणि जोहान्सबर्गमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन कसोटी सामने जिंकले.

टी-२०मध्येही स्पेनचा विश्वविक्रम

स्पेनने यापूर्वी २०२४ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. ग्रीसचा पराभव करत स्पेनने या फॉरमॅटमधील सलग १४वा विजय मिळवला होता. स्पेनला १९९२ मध्ये ICCचं Affiliate Member म्हणून मान्यता मिळाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना असोसिएट देशाचा दर्जा मिळाला. क्रिकेटमध्ये तुलनेने नवखा असलेल्या स्पेनने आता सलग विजयांच्या विक्रमात ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला मागे टाकत मोठा पराक्रम केला आहे.

२०१९ मध्ये सर्व सदस्य देशांसोबत स्पेनला टी-२० आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यापासून असोसिएट संघांमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. जानेवारी २०१९ पासून स्पेनने आतापर्यंत ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी तब्बल ४१ सामने जिंकले, तर केवळ ८ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे.

फुटबॉलमध्येही स्पेनचा दबदबा कायम आहे. गेल्या महिन्यात न्यू जर्सी येथे झालेल्या फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत स्पेनने विजेतेपद पटकावलं. याआधी स्पेनने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सलग ३८ सामने अपराजित राहण्याचा विक्रम रचत सर्वाधिक काळ पराभव न स्वीकारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सलग सर्वाधिक विजय:

२१* विजय – स्पेन (२५/०२/२०२३ – सध्या सुरू)
२० विजय – ऑस्ट्रेलिया (११/०१/२००३ – ०१/०५/२००३)
१७ – युगांडा – (२९/१०/२०२४ – २७/०७/२०२५)