Spain vs Argentina World Cup Final: विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२६ च्या अंतिम फेरीत युरोपियन विजेता स्पेन आणि लॅटिन अमेरिकन विजेता अर्जेंटिना हे मातब्बर संघ रविवारी न्यूयॉर्कमध्ये भिडतील. त्यावेळी हे द्वंद्व दोन शैलींमधील असेल. लिओनेल मेसीचा वैयक्तिक करिष्मा विरुद्ध स्पेनचा रचनाबद्ध सांघिक खेळ यांच्या आधारावर दोन्ही संघ परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील.

फ्रान्ससारख्या आक्रमक संघाला – विशेषतः किलियन एम्बापेला यशस्वीरीत्या रोखून स्पेनने रचनात्मक, तंत्रशुद्ध खेळातून काय करता येऊ शकते याची पुरेशी झलक उपांत्य सामन्यात पेश केली. स्पेनचा खेळ इतका शिस्तबद्ध आणि आखीव होता, की फ्रान्सचा गोलच्या दिशेने पहिला फटकाच ८३व्या मिनिटाला नोंदवला गेला. उपांत्य फेरीपूर्वी स्पेन आणि फ्रान्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी एकेक गोल स्वीकारला होता. पण या दोन मातबर संघांमध्ये सामना झाला, त्यावेळी स्पेनने भक्कम गोलरक्षण करताना, फ्रान्सवjच दोन गोल चढवले.

अर्जेंटिनाने या स्पर्धेत पिछाडीवरून येऊन गोल करण्याची धमक इजिप्त (राउंड ऑफ १६ फेरी) आणि आता इंग्लंडविरुद्ध दाखवली. तर केप व्हर्डे (राउंड ऑफ ३२ फेरी) आणि स्वित्झर्लंड (उपांत्यपूर्व फेरी) या दोन्ही संघांविरुद्ध त्यांचे सामना अतिरिक्त वेळेत गेले. तरीदेखील लिओनेल मेसीचे गोलधडाका आणि गोलसाह्य यांच्या जोरावर अर्जेंटिना प्रतिस्पर्ध्याला सातत्याने दबावाखाली ठेवू शकले. स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पूर्ण वेगळ्या प्रकारे पोहोचले आहेत. त्यांच्यात तुलना करण्यापूर्वी दोन्ही संघांची वैशिष्ट्ये तपासणे योग्य ठरेल.

स्पेनचा ‘टिकी-टाका’ चक्रव्यूह!

कुकुरेया, रॉड्री, ओयरझबाल, ओल्मो, पेड्री, रुइझ, मेरिनो, पोरो ही नावे फुटबॉल वर्तुळाच्या बाहेर फारशी परिचित नाहीत. यांच्या नावांचे टी-शर्ट, जर्सी घालून फुटबॉलप्रेमी किंवा लहान मुले मिरवत नाहीत. स्पेनच्या लमिने यमालचे नाव सुपरिचित आहे. तसे पाहायला गेल्यास स्पेनचा तो एकमेव वलयांकित फुटबॉलपटू. अवघ्या १९व्या वर्षी त्याला युरो स्पर्धेपाठोपाठ आता विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचे भाग्य लाभले. या स्पर्धेत त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तरी त्याला आतापर्यंत केवळ एकच गोल करता आला. पण यामुळे स्पेनचे फारसे बिघडलेले नाही. फ्रान्सविरुद्ध त्यांचा तुलनेने सहज मिळवलेला विजय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. खुद्द स्पॅनिश खेळाडू आणि प्रशिक्षक लुइस डे ला फुएंते यांना या विजयाविषयी सुरुवातीपासूनच आत्मविश्वास होता. फ्रान्सची ताकद किलियन एम्बापे आणि ओस्मान डेम्बेले आणि या दोघांना पासेसचा पुरवठा अविरत करणारा मायकेल ओलिसे या त्रिकुटाच्या समन्वयावर प्रामुख्याने होते. स्पेनने पोरो आणि कुकुरेया या दोघांना खास हा समन्वय खंडित करण्यासाठी पाठवले आणि ते कमालीचे यशस्वी झाले. दोघांपासून विलग झालेल्या डेम्बेलेलाही त्यामुळे फार काही करता आले नाही. हे करत असताना, मैदानाच्या मधल्या भागात अर्थात मिडफील्डमध्ये संख्यात्मक वरचष्मा राखण्याचे डावपेच स्पेनने वापरले. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासून एम्बापे आणि त्याच्या सहकाऱ्यांना लयच सापडली नाही. गोलांचा पाठलाग करण्याऐवजी फुटबॉलचा पाठलाग करण्याची वेळ एम्बापे, डेम्बेले, ओलिसे यांच्यावर आली.

स्पेनच्या बदललेल्या डावपेचावर तोडगा शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या फ्रान्सला बचावफळीही अभेद्य राखता आली नाही. त्याचा फायदा उठवत स्पेनने गोलही केले. या स्पर्धेत प्रथमच फ्रान्स पिछाडीवर पडला. ही पिछाडी फ्रान्सला संपूर्ण सामन्यात भरून काढता आली नाही. चेंडूवर सातत्याने ताबा मिळवणे (पझेशन), प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रात ठाण मांडणे (प्रेसिंग), चेंडू प्रतिस्पर्ध्याकडे गेल्यास तो पुन्हा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे (काउंटर प्रेसिंग) या तंत्रात स्पॅनिश संघ निष्णात आहे. याची चोख अंमलबजावणी करून स्पेनने फ्रान्सचे प्रवाही फुटबॉल विस्कळीत करून सोडले. फ्रान्सच्या डावपेचातील प्रमुख उणीव म्हणजे, अशा प्रकारे एम्बापे-ओलिसे यांना रोखल्यास पर्यायी व्यूहरचनेचा विचारच प्रशिक्षक डिडिए डेशां यांनी केलेला दिसला नाही. स्पेनची खेळी त्यामुळेच कमालीची यशस्वी ठरली.

या स्पर्धेत स्पेनची वाटचाल फ्रान्सप्रमाणे आकर्षक नव्हती. पहिल्याच सामन्यात त्यांना नवख्या केप व्हर्डेने गोलशून्य बरोबरीत रोखले. पण नंतर प्रत्येक टप्प्यावर त्यांचा खेळ उंचावत गेला. सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रिया यांना त्यांनी सहजपणे हरवले. तर उरुग्वे, पोर्तुगाल, बेल्जियम यांना एका गोलच्या फरकाने हरवले. या वाटचालीत त्यांनी केवळ एकच गोल स्वीकारला. स्पेनचा हा अभेद्य बचाव हे केवळ या स्पर्धेचे वैशिष्ट्य नाही. ते गेले ३७ आंतरराष्ट्रीय सामने पराभूत झालेले नाहीत, जो एक विक्रम आहे. या संघाने २०२३मध्ये युरोपियन नेशन्स चषक आणि २०२४मध्ये युरो चषक या स्पर्धा जिंकल्या. २०२५मध्ये नेशन चषक स्पर्धेत ते अंतिम फेरीत पोर्तुगालकडून पेनल्टी शूटआउटवर पराभूत झाले. त्यांच्या गुणवत्तेची कल्पना फ्रेंच प्रशिक्षक डेशां यांनाही होती. त्यामुळेच फ्रान्स-स्पेन लढतीत त्यांच्या मते स्पेनचे पारडे जड होते. घडलेही तसेच.

अर्जेंटिनासाठी मेसी… अनिभिषिक्त, अविभक्त!

लिओनेल मेसीने २०२२मधील विश्वचषक अर्जेंटिनाला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या कारकीर्दीतल अखेरचा पण सर्वाधिक महत्त्वाचा चषक जिंकल्यानंतर मेसी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करेल, असे वाटले होते. पण तसे घडले नाही. अर्जेंटिनासाठी खेळत राहण्याची इच्छाशक्ती, गोलांची भूक, अत्युच्च पातळीवर आवश्यक ऊर्जा आणि तंदुरुस्ती मेसीकडे ३८-३९व्या वर्षीही कायम आहे. अर्जेंटिनाच्या त्या विश्वविजयी संघातील बहुतेक जण विद्यमान संघातही आहेत. फुटबॉल रसिक आणि विश्लेषकांच्या मते यांतली बरीचशी मंडळी तुलनेने थकलेली आहेत आणि त्यांचे कौशल्यही बोथट झाले आहे. अर्जेंटिनाची या स्पर्धेतली वाटचाल पाहता, त्या दाव्यात काही अंशी तथ्य दिसून येते. साखळी टप्प्यात त्यांनी अल्जीरिया, ऑस्ट्रिया आणि जॉर्डनविरुद्ध सहज विजय मिळवले. पण बाद फेरीत जवळपास प्रत्येक सामन्यात त्यांना शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला.

केप व्हर्डे (३-२, अतिरिक्त वेळेत), इजिप्त (३-२, जायबंदी काळात), स्वित्झर्लंड (३-१, अतिरिक्त वेळेत) हे संघ अर्जेंटिना किंवा इतर संघांसारखे मातब्बर नाही. पण प्रत्येक संघाने अर्जेंटिनाविरुद्ध एक किंवा अधिक गोल केले. इंग्लंडविरुद्धही पिछाडीवरून अर्जेंटिनाने २-१ असा विजय जायबंदी काळात मिळवला. त्यामुळे अर्जेंटिनाचा खेळ खरोखरच विद्यमान विजेत्यांसारखा झाला असा प्रश्न उपस्थित होतो. तरी या सगळ्यामध्ये लिओनेल मेसीचे योगदान दुर्लक्षण्यासारखे नाही. अर्जेंटिनाच्या १९पैकी १२ गोलांमध्ये मेसीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष (८ गोल, ४ सहाय्य) सहभाग होता. शिवाय पिछाडीवर पडूनही शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहण्याची अर्जेंटिनाची चिकाटी आणि आत्मविश्वास इतर बहुतेक संघांपेक्षा अधिक दिसून येतो. उपांत्य फेरीत दाखल झालेल्या चारही संघांपैकी अर्जेंटिनाचे स्पर्धेतील गोल सर्वाधिक होते. तसेच मेसीचे योगदान अमूल्य असले, तरीही इतर खेळाडूंनी मिळून ७ गोल (उपांत्य फेरी धरून) केलेले आहेत. याचा अर्थ, अर्जेंटिना गोल स्वीकारत असले, तरी झळकावतही असतात. तसेच पिछाडीवर पडूनही विचलित न होण्याची त्यांची वृत्ती या स्पर्धेत किमान दोन वेळा दिसून आलेली आहेच.

विजयाची संधी कोणाला?

बांधणी, रचना आणि शिस्त या तीन घटकांचा विचार केल्यास स्पेनला संधी अधिक आहे, असे म्हणता येईल. चेंडूवर नियंत्रण मिळवून प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणण्याचे स्पेनचे डावपेच फ्रान्सविरुद्ध यशस्वी ठरले. तसेच अर्जेंटिनाच्या तुलनेत स्पेनने अधिक मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना (उरुग्वे, पोर्तुगाल, बेल्जियम, फ्रान्स) हरवलेले आहे. ते सहसा विचलित होत नाहीत आणि आपल्या व्यूहरचनेवर त्यांचा पूर्ण भरवसा असतो.

अर्जेंटिनाचा खेळ तुलनेने अधिक भावनिक आणि शारीरिक असतो. लिओनेल मेसी हा त्यांच्या व्यूहरचनेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे मेसीला लय सापडली नाही किंवा तो जायबंदी झाला, तर अर्जेंटिना अडचणीत येऊ शकतो. पण इतर संघांपेक्षा अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडे चेंडूवरील कौशल्य अधिक आहे. शिवाय विश्वचषक अंतिम सामन्यात खेळण्याचा त्यांचा अनुभव निर्णायक ठरू शकतो. कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याचे कसब त्यांच्या संघातच मुरलेले आहे. त्यामुळे एक-दोन गोलने पिछाडीवर पडूनही अर्जेंटिना कमी धोकादायक बनत नाही. मेसीला लय गवसली आणि धसमुसळ्या खेळावर नियंत्रण ठेवले, तर गोल करण्याची अर्जेंटिनाची क्षमता आहे. एकट्या मेसीला बांधून अर्जेंटिनाचा गोलधडाका थांबवता येणार नाही, कारण या संघातील इतर खेळाडूही गोल करण्यात सक्षम आहेत. शिवाय एक किंवा दोन खेळाडूला चकवून पुढे सरकण्याची कल्पकता आणि चापल्य मेसीकडे आहे. त्यामुळे स्पेनला एकापेक्षा अधिक बचावपटू मेसीसाठी धाडावे लागतील आणि यातून मैदानात इतरत्र अर्जेंटिनाच्या खेळाडूंसाठी संधी उपलब्ध होईल. मेसीला रोखणे ही जोखीम आहे, त्याला मोकळे सोडणे म्हणजे आत्मघात. या दोन प्रश्नांची उत्तरे स्पेनला शोधावी लागतील.

अर्जेंटिनाचे यश गोल करण्यावरच अवलंबून राहील. या प्रयत्नात त्यांचा बचाव काहीसा उघडा पडू शकतो. असाही हा संघ भक्कम बचावासाठी ओळखला जात नाही. त्यामुळे या सामन्यात गोलधडाका अपेक्षित आहे. सुरुवातीचा गोल करणाऱ्या संघास एरवी स्थिती अनुकूल मानली जाते. या स्पर्धेतील चित्र जरा वेगळे दिसून आले. त्यामुळे पहिला गोल करणारा संघ प्रमाणाबाहेर निर्धास्त खेळू शकत नाही. तरीदेखील, स्पेनने त्यांची रचना कायम ठेवली आणि अर्जेंटिनाच्या गोलांवर नियंत्रण आणले तर भरकटलेला अर्जेंटिनाचा संघ आत्मघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास, २०१४ विश्वचषकातील उपांत्य सामन्यात शिस्तबद्ध जर्मनीविरुद्ध यजमान ब्राझीलचे हसे झाले, ती शक्यता सर्वस्वी नाकारता येत नाही.

siddharth.khandekar@expressindia.com