France vs Spain, FIFA World Cup Semi Final 2026: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. स्पेन आणि फ्रान्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये स्पेनने २-० ने बाजी मारून १६ वर्षांनंतर या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. फ्रान्सला यावेळी जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण या सामन्यात फ्रान्सच्या खेळाडूंना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यात फक्त २ गोल झाले आणि हे दोन्ही गोल स्पेनच्या खेळाडूंनी केले. या महत्वाच्या सामन्यात एम्बाप्पेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र तो एकही गोल करू शकलेला नाही.

या सामन्यातील सुरुवातीच्या २२ व्या मिनिटात एकही संघाला गोल करता आला नव्हता. २२ व्या मिनिटाला स्पेनला पेनल्टी मिळाली आणि मिकेल ओयारजबालने संधीचं सोनं करून पहिला गोल केला आणि आपल्या संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फ्रान्सचा संघ बरोबरी करणार की काय? अशी चिन्ह होती. पण ५८ व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेड्रो पेरोने गोल केला आणि स्पेनला २-० ने आघाडी मिळवून दिली.

फ्रान्सला सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी होती. संपूर्ण स्पर्धेत फ्रान्सने दमदार खेळ केला. पण महत्वाच्या सामन्यात फ्रान्सचे खेळाडू एकही गोल करु शकले नाहीत. याआधी २०१८ मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात क्रोएशियाला हरवून फ्रान्सचा संघ जेतेपदाचा मानकरी ठरला होता. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत फ्रान्सने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम फेरीत फ्रान्सला अर्जेंटिनाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी फ्रान्सला पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश करून हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली.

तर स्पेनने १६ वर्षानंतर फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पेनने याआधी २०१० मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ग्रुप स्टेज, २०१८ मध्ये राऊंड ऑफ १६, २०२२ मध्ये राऊंड ऑफ १६ आणि २०२६ मध्ये या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.