अटलांटा : पहिल्या सामन्यातील निराशाजनक बरोबरीनंतर स्पेनने ओयारझाबाल आणि लामिन यमाल यांच्या पूर्वार्धातील सुरेख खेळाच्या जोरावर आपली गाडी विजयाच्या मार्गावर आणली. सामन्यावर निर्विवादपणे वर्चस्व राखत स्पेनने सौदी अरेबियाचा ४-० असा पराभव केला. या विजयाने स्पेनने बाद फेरीच्या आशांना बळकटी देत चार गुणांसह ‘एच’ गटातून अग्रस्थान पटकावले.
स्पेनने पहिल्या सामन्यात केलेली चूक सुधारली. प्रमुख खेळाडू यमालला सुरुवातीपासून खेळवले. याचा फायदा त्यांना झाला. सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला मिकेल ओयारझाबालच्या पासवर शानदार गोल करुन त्याने स्पेनचे खाते उघडले. त्यानंतर स्पेनने मागे वळून बघितलेच नाही. खेळावर पूर्ण नियंत्रण राखत जलपानाच्या विश्रांतीपूर्वी आणि नंतर असे लागोपाठ तीन मिनिटांत दोन गोल नोंदवत स्पेनने सौदी अरेबियावरील दडपण आणखी वाढवले. दोन्ही गोल करणार्या ओयारझाबालने प्रथम २१व्या मिनिटाला सौदीच्या कमकुवत बचावाचा फायदा उठवून डॅनी ओल्मोच्या पासवर गोल केला. त्यानंतर २४व्या मिनिटाला लॅपोर्टेच्या पासवर वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला.
सामन्याच्या उत्तरार्धाची सुरुवात पुन्हा एकदा सौदी अरेबियासाठी निराशाजनक झाली. उत्तरार्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत स्पेनला चौथा गोल मिळाला. स्पेनच्या मार्क कुकुरेलाने कॉर्नरवरून आलेल्या बॉलवर मारलेला व्हॉली शॉट सौदीचा गोलकीपर अल-ओवेस याला लागून बचावपटू हसन अल-तामबक्तीला धडकून चुकून स्वत:च्याच गोलपोस्टमध्ये गेला.
दुसर्या सत्रात अनेक बदल झाल्यामुळे खेळाचा वेग मंदावला. निर्णायक आघाडीनंतर स्पेननेही आपल्या खेळाची तीव्रता कमी केली. त्यानंतरही सौदी अरेबिया संघाला विश्वचषकात युरोपियन संघांविरुद्ध नऊ सामन्यानंतर एकही गोल करता आला नाही. स्पेनने संथ खेळानंतर अचानक भरपाई वेळेत सुरेख चाल रचली. सामन्याच्या ९२ व्या मिनिटाला पेद्रो पोरोच्या क्रॉसवर फेरान टॉरेसने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला होता. मात्र, तिसर्या पंचांनी (वार) प्रदीर्घकाळ तपासून टोरेस ऑफसाईड असल्याचा निर्णय दिल्याने गोल नाकारण्यात आला.
