मुंबई : फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करून दुसर्‍यांदा जगज्जतेपद पटकावले. गेल्या १८ वर्षांमध्ये या संघाने तीन युरो आणि दोन जगज्जेतेपदांची कमाई केली. या जोडीला नव्याने सुरू झालेल्या नेशन्स लीग स्पर्धेचे अजिंक्यपदही त्यांनी पटकावले. विशिष्ट एका खेळाडूवर अवलंबून न राहता, संपूर्ण सांघिक, सूत्रबद्ध पद्धतीचे फुटबॉल खेळून स्पेनने जगभरातील फुटबॉलप्रेमींची मने जिंकली.

आजवर ब्राझील (५), इटली (४), जर्मनी (४), अर्जेंटिना (३), फ्रान्स (२), स्पेन (२), इंग्लंड (१) अशा आठच देशांना विश्वचषक जिंकता आला. परंतु या महारथी संघांमध्ये स्पेनची कामगिरी नवीन शतकात सर्वाधिक उजवी झाली असेच म्हणावे लागेल. जगज्जेत्यांच्या ‘क्लब’मध्ये स्पेन सर्वांत उशिराने म्हणजे २०१० मध्ये दाखल झाला. नवीन शतकात ब्राझील (२००२), इटली (२००६), जर्मनी (२०१४), फ्रान्स (२०१८) आणि अर्जेंटिना (२०२२) या प्रस्थापित सत्तांनी एकेकदा जगज्जेतेपद पटकावले.

स्पेनने यांच्या तुलनेत २०१० आणि २०२६ अशा दोन विश्वचषकांवर नाव कोरले. या जोडीला २००८, २०१२ आणि २०२४ युरो अजिंक्यपदांचा विचार केल्यास स्पेनची कामगिरी अधिकच झळाळते. युरो आणि पाठोपाठ विश्वचषक जिंकण्याची किमया स्पेनने दोनदा (२००८, २०१०; २०२४, २०२६) साधली.

जर्मनीने प्रथम (१९७२, १९७४) अशी कामगिरी केली होती. तर विश्वचषकानंतर युरो जिंकण्याची करामतही (२०१०, २०१२) स्पेनच्या नावावर आहे. त्यांच्याव्यतिरिक्त केवळ फ्रान्सलाच (१९९८, २०००) हे जमले. पण या आकड्यांपेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे, स्पेनने विशिष्ट फुटबॉल शैली विकसित केली, जी सातत्याने अजिंक्य ठरू लागली आहे. विद्यमान प्रस्थापित देश किंवा इतरही मोठ्या संघांना हे जमू शकलेले नाही. त्यामुळेच स्पेनचा संघ अधिक सातत्य दाखवत आहे.

चेंडूवरील ताबा न सोडणे, छोटे पासेस देत राहणे (ज्यास टिकी-टाका शैली असेही म्हटले जाते), प्रतिस्पध्र्याकडे चेंडू असल्यास तो परत मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे ही काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ही सगळी करामत मैदानावर सामूहिक शिस्तबद्धतेने सादर करणे ही स्पेनची खरी ताकद आहे.