एपी, माद्रिद : गतविजेत्या अर्जेंटिनाला निष्प्रभ करून दुसर्यांदा विश्वविजेतेपदाचा मान पटकाविणार्या स्पेन फुटबॉल संघाच्या स्वागतासाठी मायदेशात राजधानी माद्रिदमध्ये विजयोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पहायला मिळाला. तब्बल २० लाख चाहत्यांनी रस्त्यांवर उतरून आपल्या लाडक्या २६ शिलेदारांचे आणि प्रशिक्षकांचे शाही स्वागत केले. खुल्या बसमधील खेळाडूंचा डान्स, ‘सिबेलेस स्क्वेअर’वरील ऐतिहासिक गर्दी आणि संपूर्ण देशात घुमणारा ‘सोमोस कॅम्पेओनेस’च्या (आम्ही विजेते आहोत) आवाजाने अवघे स्पेन दणाणून गेले होते.
मायदेशी परतल्यानंतर २६ खेळाडूंनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी प्रथम देशाच्या राजघराण्याची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची भेट घेतली. ‘‘खेळाची उत्कृष्ट शैली, घेतलेले अपार कष्ट आणि या भव्य विजयासाठी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनापासून आभार. तुमचा खेळ पाहताना आम्हांला अतिशय आनंद झाला,’’ अशा शब्दांत पंतप्रधान सांचेझ यांनी संघाचे कौतुक केले.
दुर्दैवी घटनेचे गालबोट
स्पेनमधील या विजयी जल्लोषाला दुर्दैवी घटनेचे गालबोट लागले. माद्रिदच्या वायव्येस असलेल्या सालामान्का येथे एका कारंज्यावर काही तरुण मुले विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चढली होती. ते कारंजे कोसळल्यामुळे एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. ही घटना विसरून चाहते आपल्या परीने आनंद व्यक्त करत होते. या गर्दीत असलेले एक ५९ वर्षीय सरकारी कर्मचारी गेमा रोदेरो म्हणाले, ‘‘हे खूप थरारक होते. आम्ही रस्त्यावर उतरलो असलो तरी, कोणत्याही हॉटेल किंवा बाहेर न जाता, घरीच पूर्ण लक्ष देऊन सामना पाहिला आणि विजयाचा मनमुराद आनंद घेतला.’’
‘सिबेलेस स्क्वेअर’वर मुख्य सोहळा
पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘मोन्क्लोआ पॅलेस’पासून सुरू झालेली ही मिरवणूक ऐतिहासिक मार्गांवरून ‘सिबेलेस स्क्वेअर’ येथे पोहोचली. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मुख्य सोहळ्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार लोक उपस्थित होते.
व्यासपीठावर प्रत्येक खेळाडूची ओळख करून देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक खेळाडूने त्याच्या प्रवेशाच्या वेळी वाजवण्यासाठी स्वत:चे आवडते गाणे निवडले होते. आपला २५वा वाढदिवस साजरा करणार्या ॲलेक्स बाएनाने विश्वचषक हातात घेऊन व्यासपीठावर प्रवेश केला. प्रशिक्षक दे ला फुएंटे यांची ओळख करून दिल्यानंतर खेळाडूंनी त्यांना हवेत उचलून धरले. एकाक्षणी तर खेळाडू बोर्जा इग्लेसियासने डीजेची भूमिका बजावली, ज्यावर त्याचे सहकारी खेळाडू मनसोक्त नाचले.
या सोहळ्यात आयताना, आना मेना आणि लोला इंदिगो या प्रसिद्ध गायिकांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. संपूर्ण स्पेन संघाने स्थानिक चाहत्यांसमोर पुन्हा एकदा विश्वचषक हवेत उंचावून या सोहळ्याची सांगता केली.
चाहत्यांचा अभूतपूर्व उत्साह
संघ माद्रिदमध्ये पोहोचण्यापूर्वीच, चाहत्यांनी ‘सिबेलेस स्क्वेअर’वर लोकांनी जागा पकडण्यास सुरुवात केली होती. कडक उन्हात तब्बल ३५ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करण्यासाठी लोकांनी सोबत छत्र्या आणल्या होत्या. हे ठिकाण स्पॅनिश संघांच्या आणि विशेषत: ‘रेयाल माद्रिद’ क्लबच्या विजयाच्या उत्सवाचे पारंपारिक केंद्र आहे. एकूण १८ लाख लोकांनी संघाला माद्रिदमध्ये मानवंदना दिली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात फेरान टोरेसने अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करत स्पेनला दुसर्यांदा विश्वविजेते बनवले.
यापूर्वी स्पेनने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. सामन्याची अंतिम शिट्टी वाजताच संपूर्ण माद्रिद शहर उत्सवात बुडून गेले. हजारो समर्थक स्पेनचे ध्वज आणि संघाच्या रंगांचे कपडे घालून रस्त्यावर आले. प्युएर्ता दे सोल आणि इतर प्रमुख चौकांमध्ये लोक गाणी गात, नाचत आणि फटाके फोडत होते. हा उत्सव सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होता.
बदललेला स्पेन
कडक उन्हातही अहोरात्र चाललेल्या या ऐतिहासिक जल्लोषाने बदललेल्या आणि नव्या दमाच्या स्पेनचे एक वेगळेच चित्र जगासमोर आणले आहे. अनेक तरुण चाहत्यांसाठी पुरुषांच्या संघाला विश्वचषक जिंकताना पाहण्याची आणि त्यानंतरचा हा देशव्यापी जल्लोष अनुभवण्याची ही पहिलीच वेळ होती. सोळा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजचा स्पेन खूप बदलला आहे. स्पेनने पहिले विजेतेपद २०१० मध्ये मिळविले तेव्हा देश आर्थिक संकट, बेरोजगारी आणि अंतर्गत राजकीय तणावाचा सामना करत होता. मात्र, सध्या स्पेनची अर्थव्यवस्था विस्तारत आहे, बेरोजगारीचा दर निम्मा झाला आहे .आणि युरोझोनमधील सर्वात वेगाने वाढणार्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्पेनची गणना होत आहे.
अलौकिक दुहेरी विश्वविजेतेपद
स्पेनच्या महिला संघाने २०२३ मध्ये महिला विश्वचषक जिंकला होता, आणि आता पुरुषांच्या संघानेही विश्वचषक जिंकल्यामुळे एकाच वेळी दोन्ही विश्वविजेतेपद राखणारा स्पेन हा जगातील पहिला युरोपियन देश ठरला आहे. पुरुष संघ तर, विद्यमान युरोपियन विजेता देखील आहे.
