माद्रिद : बार्सिलोना घरच्या मैदानावर पराभूत झाल्याने रेयाल माद्रिदचा स्पॅनिश फुटबॉल लीगचे जेतेपद मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बार्सिलोनाला रविवारी झालेल्या लढतीत रायो व्हॅलिकानोकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागले.

बार्सिलोनाने घरच्या मैदानावर एकाच हंगामात सर्व स्पर्धातील सलग तीन सामने प्रथमच गमावले आहेत. बार्सिलोनाच्या पराभवामुळे रेयाल माद्रिद गेल्या तीन हंगामांतील आपल्या दुसऱ्या जेतेपदापासून केवळ एक गुण दूर आहे. माद्रिदला जेतेपद मिळवण्याची पहिली संधी असून शनिवारी त्यांचा सामना एस्पान्योलशी होईल. माद्रिदचा संघ दुसऱ्या स्थानावरील बार्सिलोनापेक्षा १५ गुणांनी आघाडीवर आहे. रायोकडून सामन्याच्या सातव्याच मिनिटाला अल्वारो गार्सियाने केलेला गोल निर्णायक ठरला.

प्रीमियरलीग फुटबॉल ; लिव्हरपूलचा विजय

मँचेस्टर : लिव्हरपूलने रविवारी प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत एव्हर्टनला २-० असे पराभूत करत गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या मँचेस्टर सिटीवरील दडपण वाढवले आहे. या लढतीत लिव्हरपूलकडून दुसऱ्या सत्रात अ‍ॅन्ड्रयू रॉबर्टसन (६२व्या मिनिटाला) आणि डिवोक ओरिगी (८५व्या मि.) यांनी गोल केले. या विजयानंतर लिव्हरपूलचे ३३ सामन्यांत ७९ गुण झाले आहेत.

चॅम्पियन्स  लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटी-रेयाल माद्रिदयांच्यात आज उपांत्य लढत

मँचेस्टर : चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांना मंगळवारपासून सुरुवात होणार असून इंग्लंड विरुद्ध स्पेन असे त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इंग्लंडमधून मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल तर, स्पेनचे रेयाल माद्रिद, व्हिलारेयाल हे संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर असणार आहेत.

उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत मंगळवारी मँचेस्टर सिटीसमोर रेयाल माद्रिदचे आव्हान असणार आहे. माद्रिदचा प्रयत्न गेल्या चार हंगामांनंतर पहिल्यांदा अंतिम फेरी गाठण्यासह प्रथमच चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवण्याचाही असेल. विक्रमी १३ वेळा जेतेपद मिळवणाऱ्या माद्रिदने पॅरिस सेंट-जर्मेन आणि गतविजेत्या चेल्सीला नमवत उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे सिटीने उपांत्यपूर्व फेरीतील दोन लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिदला पराभूत करत आगेकूच केली.