टेनिसमध्ये २२ ग्रँडस्लॅम जिंकणारा चॅम्पियन खेळाडू राफेल नदालच्या घरी एक छोटासा पाहुणा आला आहे. स्पॅनिश मीडिया आणि फुटबॉल क्लब रियल माद्रिदच्या म्हणण्यानुसार, नदालची पत्नी मारियाने मुलाला जन्म दिला आहे. आई आणि मूल दोघेही निरोगी असून नदालच्या संघाने याबातमीला दुजोरा दिलेला आहे. टेनिस स्टार राफेल नदाल वडील झाल्याची बातमी स्पॅनिश मीडियाने शनिवारी दिली. वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदालची पत्नी मारिया फ्रान्सिस्का पेरेलो हिने माजोर्का येथील एका खासगी क्लिनिकमध्ये मुलाला जन्म दिला आहे.

नदाल आणि मारिया यांनी तीन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. राफेल नदालने हा आनंद काही महिन्यांपूर्वीच चाहत्यांसोबत शेअर केला होता आणि आता त्याच्या पत्नीने स्पेनमधील एका खासगी क्लिनिकमध्ये मुलाला जन्म दिल्याचे कळते. नदाल पहिल्यांदाच वडील झाला असून मुलाच्या जन्मामुळे त्याने काही दिवसांपूर्वीच स्पर्धेतून माघार घेतली होती. रिअल माद्रिदने त्याचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.

नदाल, सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक खेळाडू आहे आणि सहसा त्याचे कुटुंब आणि पत्नी प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहतात. कधीकधी नदालच्या सामन्यात त्याची पत्नी मारिया त्याला चिअर करण्यासाठी पोहोचते. अनुभवी टेनिसपटू राफेल नदालने २०१९ मध्ये त्याची गर्लफ्रेंड मारियाशी लग्न केले. प्रसार माध्यमांतील माहितीनुसार, ते २००५ पासून एकमेकांना डेट करत होते. नदालने १४ वर्षांच्या नात्याचे लग्नात रूपांतर केले. दोघांचे लग्न स्पेनमधील एका प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये झाले. नदालचे लग्न खूप गाजले होते.

आमच्या प्रिय मानद सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन. या क्षणाचा आनंद वाटून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. हार्दिक शुभेच्छा, असे रिअल माद्रिदने म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी नदालने लेव्हर चषकात दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररसोबत हातमिळवणी केली होती. हा फेडररचा निरोपाचा सामना होता. त्यानंतर स्विस स्टारने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. फेडररच्या निरोपातील सामन्यामध्ये नदालही भावूक झाला आणि त्यानंतर अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.