scorecardresearch

लक्ष्यचे लक्षवेधी यश; भारतीय बॅडमिंटन योग्य मार्गावर?

बॅडमिंटन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने उपविजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला.

प्रशांत केणी

बॅडमिंटन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने उपविजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला. पुरुष एकेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या लक्ष्यचे लक्षणीय यश हे कौतुकास्पद आहे. या यशाचे विश्लेषण केल्यास भारतीय बॅडमिंटन कोणती वाटचाल करीत आहे, याची जाणीव होते. यानिमित्ताने ऑल इंग्लंडमधील भारताची कामगिरी, लक्ष्य कोण आहे आणि पुरुषांच्या बॅडमिंटन यशाचा वेध-

  •   ऑल इंग्लंड स्पर्धेमधील भारताची कामगिरी यंदा कशी होती?

ऑल इंग्लंड स्पर्धेत भारताने यंदा स्पृहणीय यश मिळवले. यात लक्ष्यने उपविजेतेपद, तर त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. प्रकाश नाथ (१९४७), प्रकाश पदुकोण (१९८० ), पुलेला गोपीचंद (२००१) आणि सायना नेहवाल (२०१५) यांच्यानंतर ऑल इंग्लंडची अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य भारताचा पाचवा बॅडमिंटनपटू ठरला. यापैकी उपविजेतेपद मिळवणारा तो नाथ आणि सायनानंतरचा तिसरा खेळाडू ठरला; पण गोपीचंद यांच्यानंतर तब्बल २१ वर्षांनंतर भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूला अंतिम फेरी गाठता आली. त्रिसा-गायत्री ही जोडी ऑल इंग्लंडची उपांत्य फेरी गाठणारी भारताची पहिली महिला दुहेरीतील जोडी होती. भारताच्या पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत आदी खेळाडूंना ऑल इंग्लंड स्पर्धेवर छाप पाडता आली नाही.

  •   लक्ष्य सेन कोण आहे?

लक्ष्यचा जन्म उत्तराखंडमधील अलमोडा जिल्ह्यातील. भाऊ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू चिराग सेन आणि वडील राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक डी. के. सेन  यांच्यामुळे खेळाची आवड त्याच्यात निर्माण झाली. लक्ष्यमधील गुणवत्तेला योग्य वेळी न्याय देत वडिलांनी त्याची प्रकाश पदुकोण अकादमीत रवानगी केली. १३, १५ आणि १९ वर्षांखालील वयोगटांची राष्ट्रीय विजेतेपदे पटकावून त्याने प्रशिक्षकांचे लक्ष वेधले. २०१६ मध्ये आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक पटकावल्यावर लक्ष्य प्रकाशात आला. मग दोन वर्षांत त्याने या स्पर्धेत सुवर्णयश मिळवले. २०१६ला त्याने इंडिया इंटरनॅशनल सीरिज स्पर्धेत वरिष्ठ गटाचे पहिले जेतेपद प्राप्त केले. २०१८ मध्ये त्याने युवा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. याच बळावर त्याने जागतिक क्रमवारीत कनिष्ठ गटाचे अग्रस्थान काबीज केले होते. वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही घोडदौड करीत त्याने सात जेतेपदे आणि तीन उपविजेतेपदे पटकावली आहेत.

  •   गेल्या सहा महिन्यांमधील लक्ष्यची कामगिरी कशी आहे?

गेल्या सहा महिन्यांमधील लक्ष्यची कामगिरी जागतिक पुरुष बॅडमिंटन क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी आहे. २०२१च्या डिसेंबरमध्ये त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक पटकावले. मग २०२२ च्या जानेवारीत त्याने जगज्जेत्या लो कीन येवला २४-२२, २१-१७ असे नमवून इंडिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. मग जर्मन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनला नमवण्याचा पराक्रम दाखवला; परंतु अंतिम सामन्यात कुनलावत वितिडसॅर्नकडून झालेल्या पराभवामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर ऑल इंग्लंडच्या उपविजेतेपदाच्या वाटचालीत त्याने क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील अँडर्स अँटनसेन आणि क्रमवारीत सातव्या स्थानावरील ली झि जिआला हरवले; पण अंतिम सामन्यात अ‍ॅक्सेलसेनने त्याची वाटचाल रोखली.

  •   लक्ष्यच्या यशाचे आणि भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील स्थित्यंतराचे कसे विश्लेषण करता येईल?

ऐंशीच्या दशकात प्रकाश पदुकोण यांच्या रूपाने भारतीय बॅडमिंटनला पहिले मोठे यश अनुभवता आले. त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली. त्यानंतर दोन दशकांनी असे यश पुलेला गोपीचंदने मिळवले. महिलांमध्ये अपर्णा पोपटने आपल्या कामगिरीने वलय निर्माण केले; पण २००९पासून ‘फुल’राणी सायना नेहवालच्या कामगिरीने भारतीय बॅडमिंटनमध्ये आमूलाग्र बदल झाले. सायनाचे युग हे जसे यशोप्रवर्तक होते, तसेच मुलांच्या हाती क्रिकेटच्या बॅटऐवजी बॅडमिंटन रॅकेट देण्याइतपत संस्कृती प्रवर्तकही होते. सायनायुगामुळे या खेळाकडे पैशांचा ओघ सुरू झाला. २०१२ मध्ये सायनाने ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावले; त्यानंतर पी. व्ही. सिंधूने तिच्यापुढे एक पाऊल टाकताना ऑलिम्पिक रौप्य आणि जागतिक सुवर्णपदक मिळवले. सायना निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे, तर सिंधूच्या कारकीर्दीलाही उतरती कळा लागली आहे. सायना, सिंधूनंतर कोण, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असतानाच गेल्या वर्षांतील पुरुष बॅडमिंटनपटूंची कामगिरी लक्षणीय ठरत आहे. यंदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतने रौप्यपदक आणि लक्ष्यने कांस्यपदक पटकावले. याशिवाय समीर वर्मा, बी. साईप्रणित, एचएस प्रणॉय, अजय जयराम, पारुपल्ली कश्यप अशा अनेक पुरुष बॅडमिंटनपटूंनी आपली छाप पाडली आहे. यातील लक्ष्यचे यश हे सर्वाधिक लक्षवेधी आहे. सात्त्विसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही जोडी दुहेरीत आपली यशोपताका फडकावत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Spectacular success goal indian badminton on the right track ysh

ताज्या बातम्या