पुदुच्चेरी इथे झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया अ संघाच्या सर्वसमावेशक खेळासमोर भारतीय अ संघाने सपशेल लोटांगण घातलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका जिंकली. ऑस्ट्रेलिया अ संघाचा कर्णधार नॅथन मॅकस्विनीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

सॅम कॉन्स्टान्स (६७) आणि जोश फिलीप (५८) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलिया अ संघाने २७५ धावांची मजल मारली. सॅमने ७ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी सजवली. कर्णधार नॅथन मॅकस्विनीने ३२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मात्र या तिघांव्यतिरिक्त बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारत अ संघातर्फे डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खानने ३ तर यश ठाकूरने २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना रजत पाटीदारचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रजतने ८२ चेंडूत ६७ धावांची संयमी खेळी केली. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनुकूल रॉयने २ चौकार आणि २ षटकारासह ३४ धावा केल्या. भारताचा डाव २०६ धावांतच आटोपला.

ऑस्ट्रेलिया अ संघातर्फे स्पेन्सर जॉन्सनने ३ तर रिले मेरडिथ आणि तन्वीर संघा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. साई सुदर्शन, देवदत्त पड्डीकल तसंच कर्णधार ऋतुराज गायकवाड या अनुभवी खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. उत्तम फॉर्मात असलेल्या कुमार कुशाग्रही योगदान देऊ शकला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला होता. सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्विनी हे कसोटी संघात पुन्हा एकदा स्थान पटकावण्यासाठी आतूर आहेत. भारतीय वंशाचा निखिल चौधरी वनडे तसंच टी२० संघात स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत आहे. बेन ड्वारशियॉस, रिले मेरडिथ, स्पेन्सर जॉन्सन हे तिघे ऑस्ट्रेलियासाठी नियमित वनडे खेळतात.

ऑस्ट्रेलिया अ आणि भारतीय अ संघादरम्यान झालेल्या कसोटी मालिकेत विकेटकीपर बॅट्समन सॅम हार्परने चांगली कामगिरी केली. हार्परची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली.