विशाखापट्टणम : प्रत्येक विभागात चमक दाखवणारा भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आज, बुधवारी होणार्या चौथ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मैदानात उतरेल, तेव्हा त्यांना आपल्या फिरकीपटूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या तीन सामन्यांत वर्चस्वपूर्ण कामगिरी करीत मालिकेत विजयी आघाडी घेतली. मात्र, या सामन्यांमध्ये दोन प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती यांना अपेक्षित चमक दाखवता आली नाही. कुलदीपने दोन सामन्यांत केवळ दोन बळी मिळवले. गेल्या सामन्यात कुलदीपला तीन षटकांत ३२ धावा द्याव्या लागल्या. जसप्रीत बुमरा, रवी बिश्नोई आणि हार्दिक पंड्या यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडला ९ बाद १५३ धावांवर रोखले. त्यापूर्वी, झालेल्या एकदिवसीय मालिकेतही कुलदीपला प्रभाव पाडता आला नव्हता. चक्रवर्तीला गेल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.
पुन्हा फलंदाज प्रभावी
भारतीय गोलंदाज विश्वचषकापूर्वी या मालिकेच्या माध्यमातून कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, फलंदाज हे वेगळ्याच लयीत दिसत आहेत. तिसर्या सामन्यात भारताने केवळ १० षटकांत विजय नोंदवला. अभिषेकने ३००हून अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. सूर्यकुमार व किशन यांची चांगली साथ त्याला मिळाली. भारताने दुसर्या व तिसर्या ट्वेन्टी-२० सामन्यात अनुुक्रमे २०९ आणि १५४ धावांचा पाठलाग करताना केवळ २५.२ षटके खेळली. विशाखापट्टणमची खेळपट्टी आणि दवाचा प्रभाव यांकडे पाहिल्यास या सामन्यातही चित्र फारसे वेगळे नसेल. या मालिकेत भारतासाठी संजू सॅमसनची लय चिंतेचा विषय आहे.
कामगिरी उंचावण्याचे ध्येय
एकदिवसीय मालिकेत चमक दाखवल्यानंतर न्यूझीलंडला ट्वेन्टी-२० मालिकेत प्रभाव पाडता आलेला नाही. त्यांच्या फलंदाजांनी काही वेळा योगदान दिले. मात्र, गोलंदाज भारतीय फलंदाजांच्या आक्रमक पवित्र्यापुढे निष्प्रभ दिसले.
’ वेळ : सायं. ७ वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी; जिओ हॉटस्टार ॲप.
कुलदीप की बिश्नोई?
भारत मालिका जिंकला असला, तरीही चौथ्या सामन्यात बिश्नोईला संघात कायम ठेवावे की कुलदीपला विश्रांती देऊन त्याच्याजागी चक्रवर्तीला पुन्हा संघात घ्यावे, याबाबत संघ व्यवस्थापनाला निर्णय घ्यावा लागेल. भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीवरही सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. बोटाला झालेल्या दुखापतीनंतर नागपूरच्या पहिल्या सामन्यानंतर तो खेळू शकला नाही.
