भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंका दौऱ्यात टी-२० मालिका गमवावी लागली. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना गमावल्यानंतर यजमान संघाने जोरदार मुसंडी मारत शेवटचे दोन सामने जिंकले. या विजयांसह संघाने मालिका २-१ने जिंकली आणि वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेतला. भारताच्या पराभवानंतर कर्णधार शिखर धवनने खेळभावनेचे उत्तम दर्शन घडवले. त्याने सामन्यांनतर विरोधी संघातील खेळाडूंशी संवाद साधत आपला अनुभव त्यांच्यासोबत शेअर केला.

गुरुवारी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ केवळ ८१ धावा करू शकला. प्रत्युत्तरादाखल यजमानांनी १४.३ षटकांत आणि ३ गडी गमावत हा सामना जिंकला. २००८ नंतर द्विपक्षीय मालिकेत श्रीलंका संघाकडून पराभव होण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

 

 

हेही वाचा – ‘क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळख असलेल्या हर्षा भोगलेंनी काढली टीम इंडियाची कळ!

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने शिखर धवनने नव्या दमाच्या टीम इंडियाचे नेतृत्व केले. तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर संपूर्ण श्रीलंकेच्या संघातील खेळाडूंशी बोलताना त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धवन मैदानात उभा राहून श्रीलंकेच्या संघातील सर्व खेळाडूंना काहीतरी सांगताना दिसत आहे. त्याचवेळी सर्व खेळाडू त्याच्या भोवती उभे राहून त्याचे बोलणे ऐकत आहेत.