‘‘केंद्रशासनाने देशातील प्रत्येक भागात राहणाऱ्या खेळाडूंच्या विकासाकरिता विविध योजना अंमलात आणल्या असून सर्वाना अद्ययावत सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’’ असे केंद्रीय क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.
देशातील युवकांच्या विकासाकरिता शासनाने शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही क्रीडा सुविधा निर्माण करणे, स्पर्धाचे आयोजन करणे व खेळाडूंना आर्थिक साहाय्य देणे आदी विविध योजना अमलात आणल्या आहेत, असे सांगून सोनोवाल म्हणाले की, ‘‘ग्रामीण परिसरात विपुल प्रमाणात क्रीडा नैपुण्य उपलब्ध आहे. या नैपुण्याच्या विकासाकरिता आम्ही प्राधान्य देत आहोत.’’
सोनोवाल पुढे म्हणाले की, ‘‘ खेळ हा प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाचा शारीरिक व मानसिक विकास होतो, तसेच समाजात सन्मानाचे जीवन जगण्याची उमेद मिळते. राजीव गांधी खेल अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. त्याकरिता एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी शासनातर्फे दिला जाणार आहे. देशात सात हजार पेक्षा जास्त क्रीडा संकुले उभारली जाणार आहेत.’’