भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यामुळे या दौऱ्यावर टांगती तलवार आहे. जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. मात्र या दौऱ्याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकुर म्हणाले, ”करोनाच्या अशा परिस्थितीत, प्रत्येक बोर्डाने मग ते बीसीसीआय असो किंवा इतर कोणीही असो, त्यांनी भारत सरकारची परवानगी घ्यावी. त्यांच्याकडून अर्ज आल्यावर सरकार निर्णय घेईल.” करोनाच्या नवीन व्हेरिएंटनंतर दक्षिण आफ्रिकेचे सरकार हाय अलर्टवर गेले आहे. B.1.1529 म्हणून ओळखला जाणारा नवीन प्रकार आफ्रिकेहून बोत्सवाना आणि हाँगकाँगला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळला आहे. देशात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी केली जात आहे.

हेही वाचा – IND vs NZ : शिस्त म्हणजे शिस्त..! तडफदार IPS अधिकाऱ्यानं गाजवला सामन्याचा दुसरा दिवस; वाचा कारण

या दौऱ्याबाबत बीसीसीआयने अपडेट दिले आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. “आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (CSA) संपर्कात आहोत. अशा कठीण काळात, आपण फक्त आशा करू शकतो की गोष्टी नियंत्रणात असतील.”

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी : १७-२१ डिसेंबर : वाँडर्स, जोहान्सबर्ग
  • दुसरी कसोटी : २६-३० डिसेंबर : सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
  • तिसरी कसोटी : ३-७ जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन

एकदिवसीय मालिका

  • पहिली वनडे : ११ जानेवारी : बोलंड पार्क, पार्ल
  • दुसरी वनडे : १४ जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन
  • तिसरी वनडे : १६ जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन

टी-२० मालिका

  • पहिला टी-२० सामना : १९ जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन
  • दुसरा टी-२० सामना : २१ जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन
  • तिसरा टी-२० सामना : २३ जानेवारी : बोलंड पार्क, पार्ल
  • चौथा टी-२० सामना : २६ जानेवारी : बोलंड पार्क, पार्ल