ऑलिम्पिकसाठी संभाव्य असलेल्या खेळाडूंचा सराव कसा सुरू आहे व त्यांना काही अडचणी येत आहेत काय हे पाहण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी येथील सराव शिबिराला अचानक भेट दिली. क्रीडा मंत्र्यांच्या या भेटीमुळे खेळाडूंच्या तयारीला वेग आला आहे.

सोनवाल यांनी येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत सुरू असलेल्या अ‍ॅथलेटिक्सच्या सराव शिबिराला भेट दिली. त्यांनी धावपटू द्युती चंद, थाळीफेकपटू कृपालसिंग व बलजिंदरसिंग यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या खेळाडूंनी शिबिरातील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले असल्याचे सोनवाल यांनी सांगितले.

अंकित शर्मा याच्यासह काही खेळाडूंनी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने ऑक्टोबर २०१५ पासून आम्हाला आवश्यक असलेला पोषक आहार दिला जात नाही, अशी तक्रार करीत मंत्र्यांनी याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणीही केली. उत्तेजकाच्या भीतीने आम्हाला हा आहार दिला जात नाही, असेही शर्मा याने सांगितले. सोनवाल यांनी खेळाडूंना आवश्यक असलेला आहार दिला जाईल, असे आश्वासन दिले.