Table Tennis Federation Of India: क्रीडा मंत्रालयाने टेबल टेनिस फेडरेश ऑफ इंडियाच्या बाबतीत अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. क्रीडा मंत्रालयाने प्रशासकीय त्रुटींचं कारण देऊन टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता रद्द केली आहे. क्रीडा मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, टेबल टेनिस फेडरेश ऑफ इंडियाला याआधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि ठरलेल्या वेळेत निवडणुका न घेतल्यामुळे टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय संस्था ITTF च्या सल्ल्याने एक अंतर्गत नियामक यंत्रणा तयार करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना योग्य पावले उचलणार आहे. ज्यात तदर्थ समितीच्या (Ad hoc committee) स्थापनेचाही समावेश असणार आहे. TTFI मध्ये रीतसर प्रशासकीय रचना पूर्ववत होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहील.”

निलंबित करण्यामागचं नेमकं कारण काय?

गेल्या काही महिन्यांत टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाला आपल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि निर्णय प्रक्रियेमुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. हे सर्व पाहता हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. जुलै महिन्यात उद्धवलेला वाद यातील प्रमुख वादांपैकी एक होता. ज्यावेळी भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हिने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ निवडताना, फेडरेशनने आपल्याच नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

१९ सप्टेंबर ते ४ ऑक्टबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आयची- नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने १० सदस्यीय संघाची घोषणा केली होती. या १० खेळाडूंमध्ये मनिका बात्राचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. मनिका बत्रा ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे. तिने या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. तिने असा दावा केला होता की, फेडरेशनने तिला असं सांगितलं होतं की, ठरवून दिलेल्या नियमांनुसारच संघाची निवड करण्यात आली आहे. पण तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते की, ९ सदस्यांच्या निवड समितीने आशियाई खेळांच्या संघाबाबत अंतिम निर्णय घेतला होता.