फेसबुक, ट्विटर ही आजच्या तरुणाईची ओळख. मात्र या ऑनलाइन गोष्टींमध्ये वेळ फुकट घालवण्यापेक्षा सरावालाच मी प्राधान्य देते, असे मत अर्जुन पुरस्कारप्राप्त स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पाने व्यक्त केले. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय येथे होणार असलेल्या स्पर्धेसाठी जोश्ना मुंबईत आली आहे. जोश्नाची कामगिरी हीच पुरेशी बोलकी आहे. प्रायोजकांसाठी किंवा स्क्वॉशच्या प्रसारासाठी ती लोकांसमोर येते. मात्र तरुणाईच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या फेसबुक किंवा ट्विटरवर जोश्नाचे खातेदेखील नाही.
मद्रास क्रिकेट क्लबमध्ये वडिलांच्या बरोबरीने जोश्नाने पहिल्यांदा स्क्वॉशची रॅकेट हातात घेतली आणि त्यानंतर रॅकेट हीच तिची ओळख झाली. १३ वर्षांखालील गटात जोश्नाने स्कॉटिश खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. या पहिल्यावहिल्या जेतेपदाविषयी ती म्हणाली, ‘‘बालपणी मिळवलेल्या त्या विजेतेपदाचे महत्त्व लक्षात आले नाही. शालेय दिवसात आपल्याला परक्या देशात जायला मिळाले आहे, याचेच मला जास्त अप्रूप होते.’’
त्यानंतर जोश्नाने आपली हीच प्रगती कायम राखताना अनेक महत्त्वाच्या विजेतेपदांवर कब्जा केला. या आठवणींनी तिच्या मनात आजही घर केले आहे. ती सांगत होती, ‘‘१७ वर्षांखालील गटात ब्रिटिश खुल्या स्पर्धेआधी तब्बल चार वेळा जेतेपदाने मला हुलकावणी दिली होती. हे जेतेपद माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले. या विजेतेपदाइतकेच पाकिस्तानामध्ये आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक संस्मरणीय होते. कारण भारतीय संघाचा मी भाग होते. मला पाठिंबा द्यायला माझे सहकारी कायम असायचे. परंतु प्रत्येकाचे यश साजरे करताना केलेला जल्लोष अजूनही आठवतो.’’
कनिष्ठ स्तरामधून वरिष्ठ गटात यशस्वी संक्रमण केल्यानंतर जोश्ना दीपिका पल्लीकल, सौरव घोषाल यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन करताना दिसत आहे. तिच्या भरारीची नोंद घेत सरकारने जोश्नाला यंदा अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. याबाबत ती म्हणते, ‘‘राष्ट्रपती भवनात प्रत्यक्ष राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणे हा कारकिर्दीतील आनंदाचा क्षण आहे.’’
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आव्हान पेलण्यासाठी जोश्ना इंग्लंडमधील लीड्स येथील ज्येष्ठ स्क्वॉशपटू माल्कम विल्स्ट्रॉप यांचे मार्गदर्शन घेते आहे. मुंबईतील नामवंत प्रशिक्षक ऋत्विक भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखालीही ती सराव करते. पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे जोश्नाच्या कारकिर्दीचे गेल्या दोन वर्षांत काही प्रमाणात नुकसान झाले. या उपचारांसाठी तिला मुंबई गाठावी लागली होती.
सध्या देशात सुरू असलेल्या स्क्वॉशच्या प्रचार आणि प्रसाराबाबत जोश्ना म्हणाली, ‘‘चेन्नईतील इंडियन स्क्वॉश अकादमीच्या माध्यमातून अनेक गुणी स्क्वॉशपटू आपली कारकीर्द घडवत आहेत. देशात स्क्वॉशच्या व्यापक प्रसारासाठी अशा स्वरूपाच्या अकादम्या आणि खुला प्रवेश असलेल्या सार्वजनिक कोर्ट्सची नितांत गरज आहे.’’
आपल्या कारकिर्दीवर परिणाम करणाऱ्या दोन निर्णयांबद्दल खंत प्रकट करताना जोश्ना सांगते, ‘‘शिस्तबद्ध प्रयत्नांनंतरही स्क्वॉशचा २०२०च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये समावेश करण्यात आला नाही. तसेच या वर्षी महिला अजिंक्यपद स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. माझी कामगिरी चांगली होते आहे. त्यामुळे जगभरातील अव्वल खेळाडूंना टक्कर देण्याची ही मोठी संधी होती. मात्र ही स्पर्धाच रद्द झाल्याने माझा हिरमोड झाला आहे.’’