ICC T20I Ranking: भारतीय महिला क्रिकेट संघातील २१ वर्षीय फिरकी गोलंदाज श्री चरणीने इतिहास घडवला आहे. श्रीचरणी सध्या भारताच्या महिला टी-२० विश्वचषक संघाचा भाग असून तो संघाबरोबर इंग्लंडमध्ये खेळत आहे. श्रीचरणी सुरूवातीच्या सर्व सामन्यांमध्ये भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका वर्षातच श्रीचरणी जगातील पहिल्या क्रमांकाची टी-२० गोलंदाज बनली आहे.

महिला टी-२० विश्वचषक २०२६ दरम्यान टी-२० क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारताची श्रीचरणी पहिल्या स्थानी पोहोचली आहे. सध्या तिच्या खात्यात ७५३ रेटिंग पॉइंट्स आहेत. श्री चरणीने तिचा पहिला टी-२० सामना गेल्या वर्षी २८ जून रोजी खेळला होता. इंग्लंडमध्ये खेळवल्या जात असलेल्या महिलांच्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये तिने केवळ तीन सामन्यांत १० बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील तिच्या या शानदार कामगिरीचं प्रतिबिंब आता आयसीसी (ICC) क्रमवारीत पाहायला मिळत आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत, भारताच्या श्रीचरणीने इंग्लंडच्या लिन्सी स्मिथला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. ती सध्या ७५३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंडच्या चार्ली डीनने तीन सामन्यांत पाच बळी घेत ७३३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान, इंग्लंडची लिन्सी स्मिथ ७२६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरली आहे आणि तिची सहकारी सोफी एक्लस्टन चार स्थानांची प्रगती करत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गोलंदाजांच्या यादीत इतर संघांतील खेळाडूंनाही फायदा झाला आहे.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, महिलांच्या टी-२० फलंदाजीच्या यादीत पहिल्या स्थानावर कोणताही मोठा बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जॉर्जिया वॉल अव्वल क्रमांकाची फलंदाज म्हणून कायम आहे, तर तिची सहकारी बेथ मूनी एका स्थानाची प्रगती करत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय संघातील खेळाडू, युवा सलामीवीर शफाली वर्मा एका स्थानाची झेप घेत सहाव्या क्रमांकावर आली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौर एका स्थानाची प्रगती करत १० व्या स्थानावर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त, न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइनने ११, आयर्लंडच्या ओर्ला प्रेंडरगास्टने १३ आणि बांगलादेशच्या निगार सुलताना ज्योतीने २०वं स्थान पटकावलं आहे.