S Sreesanth Ban Lifted: भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत याला जवळपास वर्षभरानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) आपल्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याची बिनशर्त माफी स्वीकारली आणि त्याच्यावर घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली. असोसिएशनविरुद्ध बदनामीकारक विधानं केल्याच्या आरोपावरून ही बंदी गेल्या वर्षी घालण्यात आली होती.
केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) जारी केलेल्या निवेदनानुसार, बंदी उठवण्याचा निर्णय त्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. केसीएविरुद्ध केलेल्या विधानांबद्दल संबंधित क्रिकेटपटूने बिनशर्त माफी मागितल्यानंतर आणि खेद व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. श्रीसंतवर ही बंदी मागील ‘केरळ क्रिकेट लीग’ (KCL) सामन्यांपूर्वी घालण्यात आली होती.
सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणींमुळे श्रीसंतला सुरुवातीला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. या टिप्पणींमुळे संघटनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे, असं केसीएने म्हटलं होतं. श्रीसंतने या शिस्तभंगाच्या कारवाईला तिरुवनंतपुरम मुन्सिफ न्यायालयात आव्हान दिलं होतं; पण, केसीएच्या म्हणण्यानुसार, त्याची याचिका फेटाळण्यात आली.
यानंतर श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनविरूद्ध केलेल्या विधानांबद्दल खेद व्यक्त करत बिनशर्त आणि अधिकृत माफीनामा सादर केला. १ जुलै २०२६ रोजी झालेल्या असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याच्या माफीनाम्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याने व्यक्त केलेल्या बिनशर्त माफीची दखल घेऊन, त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला. मात्र, भविष्यात अशाच प्रकारचं वर्तन केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा असोसिएशनने श्रीसंतला दिला.
बंदी हटवल्यानंतर, श्रीसंत केरळ क्रिकेट लीगच्या (KCL) तिसऱ्या हंगामात ‘एरीज कोल्लम सेलर्स’ (Aries Kollam Sailors) या फ्रँचायझीचा सह-मालक म्हणून आपलं काम सुरू ठेवू शकणार आहे. KCA ने ही बंदी KCL च्या मागील हंगामापूर्वी घातली होती. भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं असून, त्याने २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले आहेत.
