Sreesanth Harbhajan Singh Slap Controversy: प्रत्येक आयपीएल हंगामात खेळाडूंमधील वाद आपल्याला पाहायला मिळतात, या वादामुळेही अनेक सीझन गाजले आहेत. यंदाच्या हंगामात मात्र अद्याप मोठे वाद पाहायला मिळालेले नाहीत. पण आयपीएल म्हटल्यावर एक वाद सर्वांना आठवतो तो म्हणजे, हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील कानाखाली वाजवण्यापर्यंत पोहोचलेला वाद. हरभजन सिंग आणि एस. श्रीशांत यांच्यातील या खळबळजनक वादाचा एक नवीन पैलू समोर आला आहे. माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने आता हरभजन सिंगवर आर्थिक फायद्यासाठी या घटनेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

२००८ मध्ये, आयपीएलच्या पहिल्या हंगामादरम्यान, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर घडलेल्या या कानाखाली वाजवण्याच्या प्रकरणाने सर्वांना धक्का बसला होता. पंजाबने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं आणि सामन्यानंतर, श्रीसंत हरभजन सिंगला भेटण्यासाठी गेला होता आणि पराभवानंतर संतापलेल्या हरभजनने श्रीसंतच्या मैदानावरच कानशिलात लगावली होती.

या घटनेने सर्वांना धक्का बसला होता आणि हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली. तेव्हापासून, प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या घटनेची चर्चा होत असते. आता, नवीन मुद्दा एका टीव्ही जाहिरातीचा आहे, ज्यामध्ये या वादाचा संदर्भ आहे आणि हरभजन त्यात सहभागी आहे. श्रीसंतने या जाहिरातीसंदर्भात हरभजनवर गंभीर आरोप केले आहेत.

श्रीसंतने हरभजन सिंगबरोबर सर्व संबंध तोडले, नेमकं काय घडलं?

एका मल्याळम वृत्तपत्राशी बोलताना श्रीसंत म्हणाला, “मी कोणत्याही मुलाखतीत भज्जीबद्दल काहीही बोललो नाही. ही पहिलीच वेळ आहे. अलीकडेपर्यंत काही अडचण नव्हती, पण त्याने या प्रकरणावर एक जाहिरात बनवली. ज्यातून त्याने ८० लाख ते १ कोटी रुपये कमावले. मग त्याने मला कॉल करून ही जाहिरात शेअर करण्यासाठी सांगितलं.”

हरभजनच्या या वागण्यामुळे श्रीसंत संतापला आणि त्याने आता त्याने भज्जीशी सर्व संबंध तोडले आहेत. श्रीसंतने पुढे सांगितलं, “मी त्याला म्हणालो, ‘मी तुला माफ करेन, पण हे कधीही विसरणार नाही.’ जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं, तर तुम्ही त्यांना माफ केलं पाहिजे पण कधीही ती गोष्ट विसरू नये, कारण जर तुम्ही विसरलात, तर ते पुन्हा तेच करतील. हरभजन याचं उत्तम उदाहरण आहे. त्या व्यक्तीशी माझं कोणतंही नातं नाही. मी त्याला भाऊ म्हणायचो, पण गेल्या १-२ महिन्यांत त्याने या प्रकरणासंबंधित ही जाहिरात केली आणि आता मी त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे.”

हा वाद यापूर्वी गेल्या हंगामातही समोर आला होता, जेव्हा तत्कालीन आयपीएलचे मुख्य ललित मोदी यांनी एका मुलाखतीत या घटनेचं फुटेज पहिल्यांदा प्रसिद्ध केलं होतं. त्यामुळेही मोठा गदारोळ झाला होता. हरभजन आणि श्रीसंत यांनी ललित मोदीवर जोरदार टीका केली होती. श्रीसंतच्या पत्नीनेही ललित मोदीवर जाहीरपणे आपला राग व्यक्त केला होता.