स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या कंपनीकडे आता मोर्चा वळवण्यात आला आहे. श्रीशांतची कंपनी नेमका कोणता व्यवसाय करते, हे हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. एस-३६ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. या नावाने असलेल्या कंपनीत श्रीशांतचा हिस्सा ७४ टक्के आहे. उर्वरित हिस्सा श्रीशांतचे पूर्वीचे प्रशिक्षक पी. शिवकुमार यांच्या नावावर असल्याची नोंद कंपन्यांच्या रजिस्टरमध्ये आहे. भारत आणि भारताबाहेरील बेटिंग कंपन्या चालवण्याचे मुख्य उद्दिष्ट श्रीशांतच्या कंपनीचे आहे, अशी नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे.
‘‘निवृत्तीनंतरचे आयुष्य घालवण्यासाठी श्रीशांतने या कंपनीची स्थापना केली होती. सट्टा कंपनी चालवणे, हे या कंपनीचे एक मुख्य उद्दिष्ट होते. अनेक देशांमध्ये सट्टा लावण्यासाठी अधिकृत परवानगी आहे. श्रीशांत निवृत्तीनंतर परदेशात स्थायिक झाला असता तर त्याने तिथे सट्टा कंपनी चालवली असती,’’ असे शिवकुमार यांनी सांगितले.
इर्नाकुलम येथे असलेले एस-३६ हे क्रीडासाहित्याचे दुकान शिवकुमार सांभाळत होता. मुथ्थूट इर्नाकुलम क्रिकेट क्लबचे ते प्रमुख होते. मात्र श्रीशांतशी मतभेद होऊ लागल्यामुळे शिवकुमार यांनी २० ऑगस्ट २०१२मध्ये कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.