आयपीएलच्या पुढील पर्वासाठी मेगा लिलाव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे वृत्त आहे. या मेगा लिलावात सर्व दिग्गज खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसणार आहेत. त्याचबरोबर केरळ एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतचे नावही या मेगा लिलावात दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीशांतने आयपीएल मेगा लिलावासाठी आपले नाव देणार असल्याची पुष्टी केली आहे. श्रीशांत बर्‍याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे, त्याने आयपीएल २०२१च्या लिलावातही आपले नाव दिले होते. मात्र, कोणत्याही संघाने श्रीशांतला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. यानंतर श्रीशांतला धक्काच बसला. ”मी कधीही हार मानणार नाही आणि टीम इंडियात परतण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन”, असे श्रीशांतने सांगितले होते.

हेही वाचा – VIDEO : फक्त एका सेंकदाचा उशीर अन्…! NOT-OUT असतानाही फलंदाजाला परतावं लागलं तंबूत; काय घडलं?

यापूर्वी, आयपीएल २०२१च्या लिलावात, श्रीशांतने त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलच्या १५व्या हंगामात १० संघ सहभागी होणार आहेत, त्यामुळे ७ वर्षांची बंदी घालण्यात आलेला आणि दीर्घकाळापासून आयपीएलमधून बाहेर असलेला श्रीशांत पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीशांतला तुरुंगात जावे लागले होते. क्रिकेटमधील बंदी उठवल्यानंतर श्रीशांत या वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसह स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला. त्याने केरळसाठी पाच सामने खेळले, त्याने २७ च्या स्ट्राइक रेटने आणि ९.८८ च्या इकॉनॉमी रेटने चार विकेट घेतल्या. श्रीशांतने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपूरमध्ये एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकचा झेल घेतल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढली. नंतर तो २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही एक भाग होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sreesanth will be putting his name for ipl 2022 mega auction adn
First published on: 29-11-2021 at 09:36 IST