सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेर केलं आहे. चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने ५ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईवरील या विजयासह सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. इशान किशनची अर्धशतकी खेळी हैदराबादसाठी मॅचविनिंग इनिंग ठरली. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच चांगली गोलंदाजी करत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. पण अखेरच्या षटकांमध्ये इशान व सलिल अरोराने षटकार-चौकार लगावत संघाचा विजय निश्चित केला.
चेन्नईने दिलेल्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची पॉवरप्लेची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ट्रॅव्हिस हेड ६ धावांवर बाद झाला. यानंतर अभिषेक व इशानने संघाचा डाव सावरला. अभिषेक २६ धावा करत बाद झाला. तर हेनरिक क्लासेनने २६ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांची खेळी करत बाद झाला, संजू सॅमसनने कमालीची स्टंपिंग करत त्याला बाद केलं. पण इशान किशनने मात्र हैदराबादच्या विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. इशानने ४७ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची खेळी केली.
इशानच्या मॅचविनिंग खेळीसह नितीश रेड्डीने ११ धावा व सलिल अरोरा १० धावा यांनी योगदान दिलं. यासह चेन्नईने १९ षटकांत ५ विकेट्स गमावत १८१ धावा करत विजय मिळवला आणि विजयासह प्लेऑफ गाठलं. चेन्नईकडून मुकेश चौधरीने २ विकेट्स घेतल्या. तर अंशुल कंबोज, नूर अहमद, अकील हुसैन यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
चेन्नई सुपर किंग्सने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेपॉकच्या मैदानावरील खेळपट्टीवर चेन्नईच्या सर्व फलंदाजांनी धावा केल्या. संजू सॅमसन १३ चेंडूत २७ धावा करत बाद झाला. ऋतुराजने २१ चेंडूत १५ धावांची संथ खेळी केली, ज्यामुळे संघाच्या धावांवर याचा परिणाम झाला. यानंतर उर्विल पटेलने १३ धावा केल्या. यानंतर कार्तिक शर्माने ३२ धावांची खेळी केली. यानंतर डेवाल्ड ब्रेविस व शिवम दुबेच्या जोडीने ३८ चेंडूत महत्त्वपूर्ण ५९ धावांची भागीदारी रचली.
डेवाल्ड ब्रेविसने २७ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने २६ धावाचं तर प्रशांत वीरने ११ धावांचं योगदान दिलं. यासह चेन्नईने २० षटकांत ७ बाद १८० धावा केल्या. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर साकिब हुसैनने २, इशान मलिंगा व प्रफुल्ल हिंगे यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
