IPL 2026 SRH beat KKR by 65 Runs: सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२६ मधील दुसऱ्या सामन्यात अखेरीस विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने ईडन गार्डन्सच्या मैदानावर केकेआरचा तब्बल ६५ धावांनी दारूण पराभव केला आहे. सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संपूर्ण संघ १६१ धावांवर सर्वबाद झाला. हैदराबादने या सामन्यात खराब फिल्डिंग केल्याने केकेआरला अनेक धावा सहजी मिळाल्या पण संघाच्या गोलंदाजांनी मात्र उत्कृष्ट कामगिरी केली. कर्णधार इशान किशनच्या नेतृत्त्वाखाली हा संघाचा यंदाचा पहिला विजय आहे.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात दणक्यात झाली. फिन एलनने पहिल्याच षटकात २५ धावा कुटत संघाला वादळी सुरूवात करून दिली. यानंतर पुढच्याच षटकात हर्ष दुबेने आपल्या गोलंदाजीवर त्याला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. एलन ७ चेंडूत २८ धावा करत बाद जाला. तर कर्णधार रहाणे ८ धावा करत माघारी परतला. तर अंगक्रिश रघुवंशीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. रघुवंशीने २९ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या आणि सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. तर उपकर्णधार रिंकू सिंहने ३५ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला, मात्र त्याला दुसऱ्या टोकावरून अपेक्षित साथ न मिळाल्याने धावांचं अंतर वाढत गेलं आणि परिणामी केकेआरने विकेट्सदेखील गमावल्या.

केकेआरकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. यानंतर इशान मलिंगा आणि नितीश रेड्डी या दोघांनी २-२ विकेट्स घेतल्या. तर हर्ष दुबेने फिन एलनला बाद करत संघाला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकत सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि हैदराबादने २२६ धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्माच्या जोडीने संघाला वादळी सुरूवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्येच ८२ धावा कुटल्या. हेड ४६ धावा तर अभिषेक शर्मा ४८ धावा करत बाद झाले, त्यामुळे दोघांचही अर्धशतक हुकलं. यानंतर इशान १४ धावांवर, अनिकेत वर्मा १ धाव करत बाद झाले. त्यानंतर हेनरिक क्लासेन व नितीश रेड्डी यांनी ८२ धावांची भागीदारी रचत संघाला २०० धावांच्या पलीकडे नेलं.

हेनरिक क्लासेनने ३५ चेंजूत ४ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. तर नितीश रेड्डीने ३९ धावांचं योगदान दिलं. यानंतर हर्ष दुबेने २ चौकार लगावत संघाला संघाला २२६ धावांचा आकडा गाठून दिला. केकेआरकडून ब्लेसिंग मुझरबानीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर वैभव अरोराने २ विकेट्स आणि कार्तिक त्यागी व अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.