SRH vs PBKS Match Highlights in Marathi: सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सच्या आपल्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. या विजयासह हैदराबादने पंजाब किंग्सकडून मागील पराभवाचा बदला घेतला आहे. सलग ३ झेल सोडल्याचा पंजाबला या सामन्यात मोठा फटका बसला, ज्यामुळे हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला. शिवाय हैदराबादने गोलंदाजीतही कमाल सुरूवात केल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत थेट पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर पंजाब किंग्सच्या कुपर कॉनोलीचं टी-२० इतिहासात झळकावलेलं पहिलं शतक व्यर्थ ठरलं.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना टॉप-५ स्फोटक फलंदाजांच्या बळावर २३५ धावांचा डोंगर उभारला. पंजाब किंग्सची गोलंदाजी आणि फिल्डिंग या सामन्यात सुरूवातीला फेल ठरली. यानंतर रनचेस करतानाही पंजाबची सुरूवात खराब झाल्याने कुपर कॉनोलीने शतक करूनही संघ २० षटकांत २०२ धावा करण्यात यशस्वी ठरला.
हैदराबादने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरूवात खूप खराब झाली आणि त्यातून संघ सावरू शकला नाही. प्रियांश आर्य पहिल्या षटकात १ धावा करत तर प्रभसिमरन सिंग दुसऱ्या षटकात ३ धावा करत झेलबाद झाले. यानंतर श्रेयस अय्यर ५ धावा करत माघारी परतला. या तीन मोठ्या विकेट्सनंतर मार्कस स्टॉयनिसने कॉनोलीसह संघाचा डाव सावरला. पण स्टॉयनिस २८ धावा करत झेलबाद झाला. तर सूर्यांश शेडगेही २५ धावा करत बाद झाला.
एका टोकाकडून विकेट्स पडत असताना कुपर कॉनोली एका टोकाकडून पाय घट्ट रोवून उभा होता. कॉनोलीने सामन्याच्या अखेरच्या षटकात शतक झळकावलं. जे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिलं शतक ठरलं. कॉनोलीने या सामन्यात ५९ चेंडूत ७ चौकार व ८ षटकारांसह १०७ धावांची खेळी केली. यामुळे पंजाबचा संघ २० षटकांत ७ बाद २०२ धावा करू शकला. हैदराबादकडून पॅट कमिन्स व शिवांग कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर नितीश रेड्डी, इशान मलिंगा, साकिब हुसैन यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
पंजाब किंग्सला ३ ड्रॉप कॅचेसचा बसला मोठा फटका
पंजाब किंग्सने सामन्याची नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केलं. हैदराबादची सुरूवात चांगली झाली. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्माच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करून दिली. हेड-अभिषेकने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. अभिषेक शर्मा १३ चेंडूत ३५ धावा करत बाद झाला. तर ट्रॅव्हिस हेड १९ चेंडूत ३८ धावा करत माघारी परतला. यानंतर आलेल्या इशान किशन व हेनरिक क्लासेनच्या जोडीने कमाल केली. या दोघांच्या अर्धशतकी खेळीमागे पंजाबने सोडलेल्या ३ झेलचं मोठं योगदान आहे.
इशान किशनला ९ आणि १८ धावांवर दोनदा जीवदान मिळालं. कुपर कॉनोली व लॉकी फर्ग्युसन यांनी इशानला जीवदान दिलं. तर शशांक सिंगने हेनरिक क्लासेनला जीवदान दिलं. यानंतर इशान किशनने ३२ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ४३ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ६९ धावांची वादळी खेळी केली. तर नितीश रेड्डीने १३ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या.
पंजाबकडून अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. तर मार्काे यान्सनने ४ षटकांत ६१ धावा दिल्या. यान्सन फेल ठरल्याचा पंजाबला मोठा फटका बसला.
