IPL 2026 SRH vs RR Highlights in marathi: इशान किशनच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हैदराबाद संघाने राजस्थानचा विजयी रथ रोखला. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दोन तारे या सामन्यात हैदराबादकडून झळकले. प्रफुल हिंगे व साकिब हुसैन यांनी या पदार्पणाच्या सामन्यातच हैदराबादसाठी तारणहार ठरले. दोघांनीही ४-४ विकेट्स घेत राजस्थानच्या फलंदाजीला सुरूंग लावला.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना या सामन्याक २० षटकांत ६ बाद २१६ धावांची खेळी केली. यानंतर राजस्थान संघाला हैदराबादच्या नव्या गोलंदाजांनी धावा करण्याची संधी दिली नाही. प्रफुल हिंगे व साकिब हुसैनच्या गोलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्सचा संघ १५९ धावांवर सर्वबाद झाला.
हैदराबादने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने पहिल्याच षटकात गुडघे टेकले. प्रफुल हिंगने वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल व लुहान डे प्रिटोरियस यां तिघांना शून्यावर बाद केलं. यानंतर दुसऱ्या षटकात साकिब हुसैनने यशस्वी जैस्वालला एका धावेवर बाद केलं. यानंतर रियान पराग प्रफुल हिंगेचा बळी ठरला. यानंतर रवींद्र जडेजा व डोनावव फरेरा या जोडीने ७२ चेंडूत ११८ धावांची भागीदारी रचली. पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
डोनावर फरेरा ४४ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ६९ धावा करत बाद झाला. तर रवींद्र जडेजा ३२ चेंडूत ५ चौकारांसह ४५ धावा करत बाद झाला. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये तुषार देशपांडेने ११ चेंडूत ३ षटकारांसह २५ धावांची खेळी केली. याशिवाय खालच्या फळीतील फलंदाजांना झटपट माघारी धाडण्याचं श्रेय साकिब हुसैनला जातं. हैदराबादकडून प्रफुल हिंगने ४ षटकांत ३४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर साकिब हुसैनेने ४ षटकांत २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय इशान मलिंगाने २ विकेट्स घेतल्या.
राजस्थानने प्रथम नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. हैदराबादची सुरूवातदेखील खराब झाली. पहिल्याच चेंडूवर आर्चरने अभिषेक शर्माला झेलबाद केलं. यानंतर इशान किशनने ट्रॅव्हिस हेडच्या जोडीने संघाचा डाव सावरला. हेड १८ धावा करत बाद झाला. यानंतर क्लासेन व इशानने ३९ चेंडूत ८८ धावांची भागीदारी रचली. क्लासेन २६ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांची खेळी केली. इशान किशनने ४४ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांसह ९१ धावांची मोठी खेळी केली. ज्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभारू शकला.
नितीश कुमार रेड्डीने १३ चेंडूत ४ षटकारांसह २८ धावांची झटपट खेळी केली. तर सलिल अरोरा १३ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावा करत अखेरच्या षटकांमध्ये संघाला २०० पार नेऊन ठेवलं. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने २ विकेट्स तर संदीप शर्मा, तुषार देशपांडे व रियान पराग यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
