Sujrisers Hyderabad Record: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स ही दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फलंदाजांकडून सुपरफ्लॉप कामगिरी पाहायला मिळाली. एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला ३०० धावा पूर्ण करण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण हैदराबादच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या १० षटकात अवघ्या ३५ धावा केल्या. यासह सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
अशी कामगिरी करणारा ठरला चौथा संघ
सनरायझर्स हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या आणि चौकार – षटकारांचा पाऊस यासाठी ओळखला जातो. पण या हंगामात उलट चित्र पाहायला मिळालं आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यात हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. हैदराबादकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण असं काहीच झालं नाही. सुरुवातीच्या १० षटकात हैदराबादला अवघ्या ३५ धावा करता आल्या. यासह सुरुवातीच्या १० षटकात सर्वात कमी धावा करणाऱ्या संघांच्या यादीत हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
आयपीएलमध्ये सुरुवातीच्या १० षटकात सर्वात कमी धावा करणारे संघ
कोलकाता नाईट रायडर्स – ३१ धावा विरुद्ध डेक्कन चार्जर्स (२००९)
राजस्थान रॉयल्स – ३२ धावा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू , २००९
मुंबई इंडियन्स – ३२ धावा विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (२०१५)
सनरायझर्स हैदराबाद – ३५ धावा विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (२०२६)
लखनौ सुपर जायंट्स संघाचा दमदार विजय या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून सलामीला आलेला ट्रॅव्हिस हेड अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. तर अभिषेक शर्मा शून्यावर माघारी परतला. इशान किशन १ तर लियाम लिव्हिंगस्टन १४ धावा करून माघारी परतला. त्यानंतर हेनरिक क्लासेनने ६२ धावांची खेळी केली. तर नितीश कुमार रेड्डीने ५६ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १५६ धावांवर पोहोचवली. लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या एडन मारक्रमने ४५ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने नाबाद ६८ धावांची खेळी करून लखनौ सुपर जायंट्स संघाला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.
