कोलंबो : संघाबाहेरील नकारात्मक वातावरण, सतत होणारी टीका, याचा खेळाडूंच्या कामगिरीवर आणि मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे आम्हाला सर्वोत्तम खेळ करता आला नाही, असे श्रीलंकेचा कर्णधार दसून शानका म्हणाला. ‘अव्वल आठ’ फेरीत इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने श्रीलंकेचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. श्रीलंकेच्या या अपयशासाठी कर्णधार शानकाने टीकाकारांना जबाबदार धरले. तसेच हे थांबविण्यासाठी सरकारने मध्यस्थी करायला हवी, असेही तो म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर शानकाने देशाची माफी मागितली, त्याच वेळी खेळाडूंवर होणार्‍या सततच्या टीकेबद्दल नाराजीही व्यक्त केली. ‘‘मैदानाबाहेर तयार होणार्‍या नकारात्मक वातावरणावर आमचे नियंत्रण नसते. आम्ही कितीही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तरी बाहेरून नकारात्मकता पसरवली जाते. याचा खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर आणि कामगिरीवर परिणाम होतो,’’ असे शानका म्हणाला.

पुढील पिढीतील खेळाडूंच्या हितासाठी सरकारने अशा नकारात्मकतेला आळा घालावा, अशी मागणीही त्याने केली. साखळी फेरीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. मात्र, ‘अव्वल आठ’ फेरीत श्रीलंकेला अपेक्षित यश मिळाले नाही. ‘‘इंग्लंडविरुद्धचा सामना आम्ही जिंकू शकलो असतो. फलंदाजीत अधिक जबाबदारीने खेळलो असतो, तर निकाल वेगळा लागला असता. चाहत्यांना आनंद देणारा विजय आम्ही मिळवू शकलो नाही याची खंत आहे,’’ असे शानका म्हणाला.