श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज न्यूवान तुषाराला आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी ए्नओसी नाकारली आहे. या निर्णयाने संतापलेल्या तुषाराने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला कोर्टात खेचलं आहे. नक्की काय आहे हे प्रकरण, एनओसी काय असते, ती कोण देतं आणि हा तिढा का निर्माण झाला ते समजून घेऊया.
प्रकरण काय?
लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने श्रीलंकेच्या न्यूवान तुषाराला १.६ कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं. २०२५ मध्ये आरसीबीने जेतेपद पटकावलं त्या संघाचा तुषारा भाग होता पण त्याला रिटेन करण्यात आलं नव्हतं. लिलावात आरसीबीने पुन्हा त्याला संघात समाविष्ट केलं. कोणत्याही विदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये सहभागी होऊन खेळण्यासाठी त्याच्या देशाच्या बोर्डाची परवानगी घेणं अनिवार्य असतं. तुषाराच्या संदर्भात श्रीलंका क्रिकेटची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अर्थात ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक असतं. तुषाराने एनसोसीकरता तोंडी विचारणा केली आणि लेखी आवेदन दिलं.
कोण आहे न्यूवान तुषारा?
३१ वर्षीय तुषारा मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. त्याने ३० टी२० सामन्यात श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो जगभरातल्या विविध लीगमध्ये नियमितपणे खेळतो. २०२४ मध्ये तुषारा आयपीएल स्पर्धेतल्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. २०२५ मध्ये विजेत्या आरसीबी संघाचा तो भाग होता. अवघ्या एका सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली होती.
श्रीलंका क्रिकेटचं काय उत्तर?
श्रीलंका क्रिकेटने तुषाराला आरसीबीसाठी खेळण्यासाठी एनओसी नाकारली. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी २ महिने फिट असणं आवश्यक असतं. आयपीएलआधीच्या महिन्यांमध्ये खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याचं श्रीलंका क्रिकेटच्या लक्षात आलं. सगळ्यांच्याच दुखापती खोट्या होत्या असं नाही पण सोशल मीडियावर अशा चर्चेला उधाण आलं होतं. फेक इंज्युरी भासवून श्रीलंकेसाठी खेळण्यासाठी अनुपलब्ध व्हायचं आणि एनओसी मिळताच आयपीएल खेळायचं असं काही खेळाडू करत असल्याचंही बोर्डाच्या लक्षात आलं. राष्ट्रीय संघासाठी खेळण्याला प्राधान्य देण्याऐवजी खेळाडू दुसऱ्या देशातल्या लीगला प्राधान्य देणं योग्य नाही अशी श्रीलंका क्रिकेटने भूमिका घेतली.
श्रीलंका क्रिकेटचं नवीन फिटनेस धोरण काय?
टी२० वर्ल्डकपमधल्या सुमार प्रदर्शनानंतर माजी खेळाडू प्रमोदया विक्रमासिंघे यांच्या नेतृत्वात नवं फिटनेस धोरण श्रीलंका क्रिकेटने अवलंबलं आहे. एनओसी मिळवण्याकरता ही फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या फिटनेस टेस्टमध्ये २ किलोमीटर धावणं, २० मीटर स्प्रिंट, ५-०-५ अॅजिलिटी टेस्ट, स्किनफोल्ड टेस्ट आणि काऊंटर मूव्हमेंट जंप यांचा समावेश आहे. या पाच गोष्टींच्या माध्यमातून खेळाडू जास्तीत जास्त २९ गुण कमावू शकतो. फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी खेळाडूने किमान १७ गुण मिळवणं आवश्यक आहे. २०२१ पासून श्रीलंका क्रिकेटने फिटनेस टेस्टकरता याची शिफारस केली होती मात्र त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र आता याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
तुषाराचं काय म्हणणं?
याआधी एनओसी मिळण्यासाठी अशी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होणं आवश्यक नव्हतं. मग आताच हे अनिवार्य का करण्यात आलं आहे. आताची फिटनेस स्थिती २०२४ आणि २०२५ मध्ये एनओसी मिळाली तेव्हाच्या स्थितीएवढीच आहे.
तुषारा कोर्टात का पोहोचला?
एनओसी न मिळाल्याने तुषारा आरसीबीसाठी खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान होणार आहे. तुषाराने श्रीलंका क्रिकेटविरुद्ध खटला दाखल केला आहे. यामध्ये त्याने कराराचा उल्लेख केला आहे. तुषाराचा श्रीलंका क्रिकेटबरोबरचा करार ३१ मार्च २०२६ रोजी संपला. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला होण्याचा त्याचा विचार होता. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटच्या एनओसीची तांत्रिकदृष्टया त्याला गरजच उरली नाही. अशा परिस्थितीत एनओसी नाकारल्याने रोजीरोटी मिळवण्याच्या मार्गात अडथळा आणल्याचं सांगत तुषाराने न्यायालयात धाव घेतली आहे. तुषाराने ३१ मार्चनंतर म्हणजे करार संपुष्टात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही त्यामुळे तूर्तास तरी तो श्रीलंकेचाच खेळाडू आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी तो संलग्न आहे. तुषारा फिट आहे त्यामुळे आरसीबीसाठी तो खेळणं अपेक्षित होतं आणि त्याकरता त्याला मानधन मिळालं असतं. मात्र एनओसी नाकारल्याने त्याच्या कमाईचा स्रोतच बंद झाला आहे.
खटल्याला किती वेळ लागणार? तुषारा आयपीएल स्पर्धेत खेळणार का?
या खटल्यात श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शमी सिल्व्हा, सचिव बंडुला दिसानायके, खजिनदार सुजीवा गोडियालादा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अॅशले डी सिल्व्हा यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. खटल्याची पहिली सुनावणी ९ एप्रिलला होणार आहे. श्रीलंकेतील कोर्टाला इस्टरची सुट्टी आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी ९ तारखेलाच होऊ शकते. एका सुनावणीत हे प्रकरण निकाली निघणं शक्य नाही. अशा परिस्थितीत तुषारा आणखी किमान दोन आठवडे तरी आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही असं दिसतं. वार्षिक कराराचा भाग नसलेल्या खेळाडूला श्रीलंका क्रिकेट एनओसी नाकारू शकतं का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. यासंदर्भात ते न्यायालयात काय युक्तिवाद करतात यावर बऱ्याच खेळाडूंचं भवितव्य ठरू शकतं. श्रीलंका क्रिकेटने २४ मार्च रोजी तुषाराला एनसोसी मिळणार नाही असं सूचित केलं होतं. त्याने १५ आणि २३ मार्चला एनओसीकरता आवेदन केलं होतं. २८ मार्च रोजी तुषाराने पुन्हा एकदा एनओसीसंदर्भात विचारणा केली होती.
आयसीसीचे नियम काय सांगतात?
आयसीसीच्या नियमानुसार विदेशात होणाऱ्या लीगमध्ये खेळण्यासाठी संबंधित देशाच्या बोर्डाची एनओसी अनिवार्य आहे. मात्र ती देण्याकरता किंवा नाकारण्याकरता विशिष्ट असे निकष आयसीसीने निश्चित केलेले नाहीत. एनओसी देणं किंवा नाकारणं हा संबंधित बोर्डाचा अंतर्गत निर्णय आहे. याआधी श्रीलंका क्रिकेटने खेळाडूंना दोनपेक्षा अधिक लीगमध्ये सहभागी होता येणार नाही असा फतवा काढला होता.
दक्षिण आफ्रिकेतही असंच प्रकरण
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सीने एनओसी न मिळाल्यानंतर न्यायालयात धाव घेतली होती. शम्सीला युएईत होणाऱ्या आयएलटी२० स्पर्धेत खेळायचं होतं मात्र त्याला एनओसी नाकारण्यात आली. शम्सीने युक्तिवाद करताना दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीत माझा समावेश नाही. क्रिकेट साऊथ आफ्रिकातर्फे आयोजित SA20 स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपल्या देशातील स्पर्धेचं ब्रँडव्हॅल्यू टिकवण्याकरता क्रिकेट साऊथ आफ्रिकेने एनओसी नाकारली. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या. कोर्टाने शम्सीच्या बाजूने कौल देत क्रिकेट साऊथ आफ्रिकेला एनओसी देण्याचे आदेश दिले. विदेशात सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या दृष्टीने हा खटला महत्त्वपूर्ण ठरला. वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीत नसलेल्या खेळाडूंना एनओसी देताना बोर्ड व्यावसायिक हितासाठी आयसीसीची एनओसी पॉलिसी राबवू शकत नाही. तुषारा प्रकरणात आणखी एक मुद्दा आहे. राष्ट्रीय संघापासून बाजूला झालेल्या खेळाडूसंदर्भात संबंधित बोर्ड अशी भूमिका घेऊ शकतं का? याचा फैसला कोर्ट करणार आहे.
आयपीएलमध्ये श्रीलंकेचे किती खेळाडू?
यंदाच्या आयपीएल हंगामात श्रीलंकेचे आठ खेळाडू सहभागी झाले आहेत. तुषाराला एनओसी नाकारण्यात आली आहे. हासारंगा आणि पथिराणा हे दुखापतग्रस्त असल्याने फिटनेस टेस्ट पार केल्यानंतरच त्यांना एनओसी देण्यात येईल. आयपीएल स्पर्धेंत सहभागी होणारे श्रीलंकेचे खेळाडू खालीलप्रमाणे- पाथुम निसांका, दुश्मंत चमीरा (दिल्ली कॅपिटल्स), मथिशा पथिराणा (कोलकाता नाईट रायडर्स), वानिंदू हासारंगा (लखनौ सुपरजायंट्स), दासून शनका (राजस्थान रॉयल्स), न्यूवान तुषारा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), कामिंदू मेंडिस, इशान मलिंगा (सनरायझर्स हैदराबाद)
