आयसीसीच्या २०१९ विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्याच्या निकषांमध्ये अखेर श्रीलंकेने बाजी मारल्याचं दिसतंय. इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे एककाळ जगज्जेता मानला जाणारा वेस्ट इंडिजचा संघ आगामी विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यास अपयशी ठरलाय. वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा श्रीलंकेला झाला असून, श्रीलंकेचा संघ आगामी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार जागतिक क्रमवारीत पहिल्या ८ संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांची कामगिरी पाहता, शेवटच्या स्थानासाठी या दोन्ही संघांमध्ये चुरस होती. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे वेस्ट इंडिज श्रीलंकेला क्रमवारीत मागे टाकणं आता जवळपास दुरापास्त मानलं जातंय. या आधारावरच श्रीलंकेला विश्वचषकात थेट प्रवेश देण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजच्या संघाला थेट प्रवेश मिळवता आला नसला तरीही त्यांच्यासाठी विश्वचषकाची दारं अद्याप बंद झालेली नाहीयेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत पहिल्या दोन स्थानांवर वेस्ट इंडिजचा संघ राहिल्यास त्यांना २०१९ साली इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषकात प्रवेश मिळू शकेल, असं आयसीसीने स्पष्ट केलंय.

वेस्ट इंडिजला आता अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, आयर्लंड या तळातल्या संघांशी दोन हात करावे लागणार आहेत. यात पहिल्या दोन स्थानांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ राहिल्यास त्यांना आगामी विश्वचषकात प्रवेश मिळू शकणार आहे. आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या नावाजलेल्या खेळाडूंना संघात परत स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खेळाडू आणि बोर्डात सुरु असलेल्या वादावरही सामोपचाराने तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणारा वेस्ट इंडिजचा संघ आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरु शकतो का हे पहावं लागणार आहे.