श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिका खेळवली जात होती. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. पण यादरम्यान इस्लामाबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. दहशतवादी हल्ल्याच्या आणि भीतीच्या वातावरणात खेळण्यास भाग पाडलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला पाकिस्तान सरकारने कडक सुरक्षा व्यवस्था दिली आहे. ज्याचे फोटो, व्हीडिओ व्हायरल होत आहेत.
इस्लामाबादमधील बॉम्बस्फोटानंतर, श्रीलंकेच्या खेळाडूंनी मालिका अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) स्वतःच्या खेळाडूंना जबरदस्ती संपूर्ण मालिका खेळण्यास भाग पाडलं. अशा परिस्थितीत, पाकिस्तान सरकारने संपूर्ण श्रीलंकेच्या संघाला देशाच्या पंतप्रधानांप्रमाणे सुरक्षा देण्यात आली, ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ डझनभर पोलिस वाहनांच्या सुरक्षेसह स्टेडियममध्ये पोहोचला.
पाकिस्तान आणि श्रीलंका रावळपिंडीमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यादिवशी, राजधानी इस्लामाबादमधील एका न्यायालयाबाहेर कार बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेचच, श्रीलंकेच्या संघातील बरेच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांनी त्यांच्या देशात परतण्याची घोषणा केली होती. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना थांबण्यासाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केला.
पाकिस्तान दौरा अर्ध्यात सोडून परतणाऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिल्यानंतर खेळाडूंना त्यांचा निर्णय बदलावा लागला. त्यानंतर, पाकिस्तान बोर्ड आणि सरकारने खेळाडूंसाठी वाढीव सुरक्षा जाहीर केली. यानंतर सुरक्षेत झालेला बदलही दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये श्रीलंकेचा संघ स्टेडियममध्ये सराव केल्यानंतर त्यांच्या हॉटेलला जाताना दिसत आहे.
काळ्या रंगाच्या कारचा पोलिसांचा ताफा स्टेडियमबाहेर दिसत आहे. बसमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला विभागण्यात आलं. संघाची बस स्टेडियममधून बाहेर पडताच, दोन पिकअप ट्रक पुढे आले, त्यानंतर श्रीलंकेच्या संघाचे खेळाडू आणि इतर अधिकारी घेऊन जाणाऱ्या सहा बस आल्या. प्रत्येक बसच्या मागे एक पोलिस पिकअप ट्रक देखील होता. यावेळी, स्टेडियमपासून हॉटेलपर्यंतचा रस्ता पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता.
पाकिस्तान बोर्डालाही मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले. १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी होणारे उर्वरित दोन सामने १४ आणि १६ नोव्हेंबर रोजी एक दिवस पुढे ढकलण्यात आले. ठिकाणात कोणताही बदल झाला नसून सामने रावळपिंडीत खेळवले जाणार आहेत.
