Under-19 Cricketers Arrested In Srilanka: श्रीलंका क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबोतील नाराहेनपीटा परिसरात एका हॉटेलमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे. श्रीलंकेच्या अंडर-१९ संघातील २ खेळाडूंनी हॉटेल रुममधील महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. ही घटना उघड होताच पोलिसांकडून दोन्ही खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये थांबलेल्या महिलांकडून तक्रार करण्यात आली होती की, बाथरूममध्ये असताना मोबाईल कॅमेऱ्यातून त्यांचे व्हिडीओ शूट करण्यात येत होते.
महिलांनी तक्रार करताच, दोन्ही खेळाडूंना ताब्यात घेण्यात आलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दोन्ही खेळाडूंना आता कोठडीत ठेवल्यानंतर आता प्रत्येकी ५ लाख श्रीलंकन रुपयांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाराहेनपीटा पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. तसेच हे व्हिडीओ सोशल मीडियावर किंवा आणखी कुठेही प्रसारित करण्यात आले आहेत का? याचा देखील शोध घेणं पोलिसांकडून सुरु आहे.
हे प्रकरण सध्या तुफान चर्चेत आहे. पण श्रीलंकन क्रिकेटकडून कुठल्याही कारवाईची घोषणा करण्यात आलेली नाही. कारण श्रीलंका क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे सुरु आहेत. गेल्या ४८ तासात श्रीलंका क्रिकेटमध्ये बरंच काही घडलं आहे. श्रीलंका क्रिकेटमधील जुन्या सदस्यांना काढून नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एखाद्या खेळाडूकडून असं कृत्य होणं ही खूप गंभीर बाब आहे. अशा प्रकरणात खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाते. अंडर-१९ क्रिकेट ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची पहिली पायरी आहे. पण या वयातच अशा घटना घडणं चिंताजनक आहे. खेळाडूंवर जबाबदारी असते, त्यांनी शिस्तीचं पालन करणं गरजेचं असतं, त्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे खूप गरजेचे आहे. हे २ खेळाडू कोण आहेत, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्या खेळाडूंचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. पण या कृत्यामुळे श्रीलंका क्रिकेटचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब झालं आहे. दोघांवर कायदेशीर कारवाई तर होणार, पण श्रीलंका क्रिकेट बोर्ड काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
